Exclusive : कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचंच एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचं भासवून या दोघांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाणघेवाणीची बोलणी केली. कुठला साठा हवा आहे, यापासून ते त्यांच्या किमतीपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या पटला (व्हिडिओ आणि ओडिओ रेकाँर्डिंग) वर घेत होती.

SHARE

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर, दानिश अली आणि दोन पाकिस्तानी नागरिकांना काही दिवसांपुर्वी अमेरिकेने शस्त्र तस्करीप्रकरणी अटक केली होती. अमेरिकेच्या या कारवाईनंतर आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी भारताकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना आता यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिशचा ताबा पोलिसांना मिळालेला आहे. सध्या दानिश हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विभागाकडे पोलिस कोठडीत आहे. दानिशच्या जिवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 


नोकरीसाठी दुबईला

 दिल्लीच्या जामा मस्जिद परिसरात कुटुंबियांसोबत राहणाऱ्या दानिशची घरची परिस्थिती बेताची होती. त्याचे वडील जामा मस्जिदमध्ये काम करायचे. मात्र, वाढतं वय आणि आजारपणामुळे त्यांनी मस्जिदची नोकरी सोडून दिली. दानिशला दोन भाऊ असून मोठा भाऊ हा रशियात डाॅक्टर अाहे. तर दुसरा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात वकील आहे. २००१ मध्ये दानिश नोकरीच्या शोधात दुबईला गेला होता. तेथे त्याची ओळख सोहेल कासकरसोबत झाली. २ ते ३ वर्ष दानिश सोहेलच्या संपर्कात होता.


स्टुडंट व्हिसावर रशियात

 या कालावधीत सोहेलचे रशियातल्या डायमंड खरेदी विक्री व्यवसायाकडं लक्ष वेधलं गेलं. हा व्यवसाय केला तर चांगला फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं होतं. मात्र रशियात तडकाफडकी या व्यवसायाची माहिती मिळणं कठीण होतं. त्यामुळं सोहेलने २००३ आणि २००४ मध्ये स्टुडंट व्हिसावर दानिशला रशियाला पाठवलं. शिक्षणाबरोबरच दानिश हा रशियातील व्यापाऱ्यांची माहिती सोहेलला देत होता. छुप्या पद्धतीने त्याने व्यवसायही सुरू केला होता. 


डायमंड तस्करी

 याच दरम्यान दक्षिण अफ्रिकेत एका डायमंड तस्करीत सोहेलला पहिल्यांदा अटक झाली.  त्यातून कशीबशी त्याने स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेत सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या भ्रष्टाचाराचा फायदा घेऊन त्यांनी शस्त्र तस्करीस सुरूवात केली. या तस्करीमुळं ते अमेरिकेच्या रडारवर आले. मात्र, अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडे त्यांना पकडण्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे या दोघांना पकण्यासाठी अमेरिकेने कट रचला होता. 


अमेरिकेकडून अटक 

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचंच एक पथक कोलंबिया सरकारच्या विरोधात असल्याचं भासवून या दोघांशी संपर्क साधला. त्यानंतर शस्त्र खरेदी आणि देवाणघेवाणीची बोलणी केली. कुठला साठा हवा आहे, यापासून ते त्यांच्या किमतीपर्यंत सर्व गोष्टी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा या दोघांच्या नकळत त्यांच्या पटला (व्हिडिओ आणि ओडिओ रेकाँर्डिंग) वर घेत होती. या दोघांकडून पुरेशी माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने सोहेल आणि दानिशसह हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल यांना स्पेनमधून २०१४ मध्ये अटक केली. 


१५ नोव्हेंबरला दानिशचा ताबा

त्यानंतर चौघेही दीड वर्ष तुरूंगात होते. चौघांनी गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांचा ताबा एबीआयला देण्यात आला. १२ सप्टेंबर २०१५ गुन्ह्यांची कबुली दिल्यामुळे न्यायालयाने दोघांना अडीच वर्षाची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, हमीद ख्रिस्ती उर्फ बेनी आणि वाहब ख्रिस्ती उर्फ एंजल या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले. सोहेल आणि दानिश या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेने प्रयत्न सुरू केल्यानंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने दानिशचा ताबा भारताला देण्याची परवानगी दिली. त्यानुसार १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दानिशचा ताबा भारतीय सुरक्षा यंत्रणेला मिळाला. 


सोहेलचा ताबा मिळणार

दानिशला डी कंपनीच्या भारतातील अनेक गुप्त धंद्यांची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची माहिती सर्वत्र पसरली असती तर त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळेच दानिशचा ताबा मिळाल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सोहेलच्या बाबतीतही दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंज्यस्य करार झालेला आहे. त्यामुळे लवकरच सोहेलचा ताबा भारताला मिळू शकतो. सोहेल विरोधात भारतात एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, त्याच्या मदतीने तपास संस्थांना डी कंपनी व त्यांच्या कारवायांविषयी माहिती मिळू शकते, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. हेही वाचा -  

दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरचं महिन्याभरात प्रत्यार्पण

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
संबंधित विषय
ताज्या बातम्या