मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न


मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मंत्रालयात वा मंत्रालयाबाहेर आत्महत्या वा आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. बुधवारी पुन्हा एकदा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला वेळीच रोखण्यात पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना यश आलं. याप्रकरणाची चौकशी मरीन ड्राईव्ह पोलिस करत आहेत.


सावकारी जाचाला कंटाळून ?

अलका कारंडे (३९) असं या महिलेचं नाव असून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. अलका यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर राॅकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी धाव घेत या महिलेला रोखलं आणि त्यांना ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेलं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारंडे यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजतं.

मंत्रालय आत्महत्येचा नवा स्पाॅट 

याआधी वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर पॅरोल सुटलेल्या एका कैद्यानं मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. महिन्याभरापूर्वी धुळ्याच्या बबन झोटे यांनीही अंगावर राॅकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठीही गणेश पवार नावाच्या तरूणानं अंगावर राॅकेल ओतण्याचा प्रयत्न केला होता. अशा आत्महत्या आणि आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घटना गेल्या सहा महिन्यांत घडल्या आहे. मात्र त्याचवेळी राज्य सरकार आणि प्रशासन या आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळं मंत्रालय हे आत्महत्येचा नवा स्पाॅट बनत असल्याचं चित्र आहे.



हेही वाचा - 

गुंतवणुकीच्या नावाखाली ७०० जणांना कोट्यवधींचा गंडा, दाम्पत्याला अटक

चोरी करणाऱ्या मोलकरणीला ६ तासात अटक




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा