नैवेद्याच्या 2100 आंब्यांचं वाटप अनाथ आश्रमात


  • नैवेद्याच्या 2100 आंब्यांचं वाटप अनाथ आश्रमात
SHARE

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून शिवाजी पार्क येथील उद्यान गणेशाला तब्बल 2100 रत्नागिरी हापूस आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. दरवर्षी  देसाई बंधूंकडून दगडू शेठ हलवाई गणपतीला नैवेद्य दाखवण्यात येतो. मात्र यंदा देसाई बंधूंच्या बहिण आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी शिवाजी पार्क उद्यान गणेशाला महानैवेद्य अर्पण करण्याचं ठरवलं.

शुक्रवारी सकाळच्या आरतीनंतर अर्पण करण्यात आलेले हे आंबे शनिवारी रात्री 11 वाजता उतरविण्यात आले आणि रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत हे आंबे भांडुपच्या वात्सल्य ट्रस्ट आणि माटुंग्याच्या श्रद्धानंद महिला आश्रमातील अनाथांना देण्यात आले. गणेश भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मंदिरात काही आंबे ठेवण्यात आले आणि मंदिर न्यासाकडून आम्हाला जे आंबे परत देण्यात आले होते ते आम्ही आश्रमात दिल्याचं मीनल मोहाडीकर यांनी सांगितलं.

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आंबे खरेदी करून खाऊ शकतात मात्र अनाथ आश्रमातील प्रत्येकाला आंबे मिळतीलच असं नाही. मात्र आम्ही या सिझनमध्ये आंबा अनाथ आश्रमापर्यंत पोहोचवू शकलो याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. 

- मीनल मोहाडीकर, उद्योजिका

संबंधित विषय
ताज्या बातम्या