Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

भारतीय स्वराज्याचा पाया...लोकमान्य टिळक!


भारतीय स्वराज्याचा पाया...लोकमान्य टिळक!
SHARES

'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?'...अशा शब्दांत तत्कालीन सरकारला सुनावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आधुनिक कट्टर पत्रकारितेचा पाया रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्यातल्या हाडाच्या पत्रकाराला लाभलेली जाज्वल्य देशभक्तीची धार ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कारभारावर वार करण्यासाठी पुरेश होती. त्यांनी दिलेली स्वराज्याची हाक आजही तरुणांमध्ये नवा उत्साह भरते. उत्कृष्ट वक्ते, प्रखर देशभक्त, जहाल विचारसरणीचे काँग्रेसवासी, समाजसुधारक, हाडाचे पत्रकार, राष्ट्रीय व्यक्तिमत्व, इतिहासकार...अशा अनेक उपाधी लोकमान्य टिळकांना दिल्या जातात. त्यांची संघर्षमयी कारकिर्द पाहिली, तर त्या उपाधी तितक्याच सार्थही ठरतात. या उपाधींना कारणीभूत ठरणाऱ्या आणि टिळकांना 'लोकमान्य' बनवणाऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या आणि व्यक्तिमत्वातल्या या काही ठळक गोष्टी:


'...जन्मसिद्ध हक्क'

1857ची क्रांती अयशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये एक प्रकारच्या निराशेचं सावट पसरलं होतं. ब्रिटिशांची अन्यायकारक वागणूक अधिक क्रूर झाली होती. अशा काळात लोकमान्य टिळकांनी भारतीयांना खडबडून जागं करणारा नारा दिला...'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!' लोकमान्यांची ही घोषणा भारतीयांना नवचैतन्य देऊन गेली.


लढण्यासाठी चतु:सूत्री!

ब्रिटिशांविरूद्धच्या लढ्याला बळ मिळावं म्हणून लोकमान्य टिळकांनी भारतीयांना चार हत्यारांच्या चतु:सूत्रीचा मंत्र दिला. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. आणि या चतु:सूत्रीचा त्यांनी आयुष्यभर आक्रमकपणे पुरस्कार देखील केला.


आक्रमक पत्रकारिता

पत्रकारिता हे टिळकांसाठी फक्त काम नव्हतं. ब्रिटिशांविरूद्धच्या लढ्यासाठीचं ते एक प्रभावी माध्यम होतं. 'मराठा' आणि 'केसरी' ही दोन वर्तमानपत्र टिळकांनी सुरु केली होती. या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून ते ब्रिटिशांच्या कारभारावर सडकून टीका करत असत. आणि त्यातून भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यासाठी चेतवत असत.


सामाजिक कुप्रथांना विरोध

समाजातल्या वाईट चालीरीतींना लोकमान्य टिळकांचा मोठा विरोध होता. 'जो स्पृश्यअस्पृश्य मानतो, मी त्याला देव नाही मानत' या भूमिकेचा टिळक जोरकसपणे पुरस्कार करत. अशा चालीरीतींविरोधात त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. व्यसनाची वाढती समस्या आणि बालविवाह या कुप्रथांवर त्यांनी सडकून टीका केली. विधवा पुनर्विवाहासाठीही त्यांनी आवाज उठवला. दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.


गणपती बाप्पा मोरया...!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या सणाची सुरुवात केली ती लोकमान्य टिळकांनी. मात्र यातून कोणताही धार्मिक विधी न करता विभिन्न प्रकारच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात एकोपा वाढवणे हाच त्यांचा यामागचा हेतू होता. यासोबतच शिवजयंती साजरी करायलाही टिळकांनीच सुरुवात केली होती.


व्यापक अभ्यासक

अभ्यासू वृत्ती हा लोकमान्य टिळकांचा बहुधा स्थायी स्वभाव होता. लहानपणापासूनच सर्वव्यापी आणि सर्व क्षेत्रांमधलं ज्ञान आत्मसात करण्यावर त्यांचा भर होता. गणित हा टिळकांचा विशेष रस असलेला विषय. मात्र त्यातही फक्त आपल्याच अभ्यासक्रमाचा अभ्यास न करता परदेशी विद्यापीठांमधल्या समाविष्ट पुस्तकांचाही अभ्यास करणं टिळकांना कायम महत्त्वाचं वाटत असे.

1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या गिरगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचा उदय आणि लोकमान्य टिळकांचा अस्त हा एकाच कालखंडात झाला. जणूकाही लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र्यलढ्याची धुराच गांधीजींच्या हाती सोपवली होती. अर्थात, दोघांचे स्वातंत्र्यलढ्याचे मार्ग जरी भिन्न असले, तरी त्यांचा हेतू एकच आणि उदात्त होता. तो म्हणजे स्वातंत्र्य. लोकमान्य टिळकांना त्यांच्या डोळ्यांनी जरी स्वातंत्र्य पहाता आलं नाही, तरी त्यांनी भविष्य डोळ्यांसमोर ठेऊनच त्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली होती. म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा जनक ही उपाधी दिली होती.


लोकमान्य टिळकांचा आवाज रेकॉर्ड झालेली दुर्मिळ क्लिप...
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा