ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना रंगकर्मी सन्मान


  • ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना रंगकर्मी सन्मान
SHARE

मुंबई - चैत्र चाहूलतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान 2017 हा पुरस्कार ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि ध्यास सन्मान 2017 या पुरस्कारासाठी श्रीमती कांचन सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे.

चैत्र चाहूलतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्काराचे यंदाचे 12 वे वर्षे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचे गेली अनेक वर्षे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात योगदान आहे. आपल्या कलात्मक निर्मिती आणि दिग्दर्शनाने त्यांनी अनेक उत्तम कलाकृती साकारल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ध्यानीमनी या चित्रपटाने रसिकांची मने जिंकली. ध्यास सन्मानासाठी निवड करण्यात आलेल्या श्रीमती कांचन सोनटक्के या मुले, विविध अपंग,प्रोढकला परफॉर्मिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अपंग कला परफॉर्मिंगच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर विविध कामे केली आणि अनेक बाल कलाकार घडविले. सोलापूर शहरातील पहिल्या अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित बालनाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बाल रंगभूमीवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मंगळवार 28 मार्च, 2017 रोजी सायंकाळी 5.30 वा. रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक कमालकर नाडकर्णी आणि सेवा सहयोग फाऊंडेशनचे संचालक संजय हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे. याप्रसंगी महर्षी दयानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय पारितोषिक विजयी एकांकिका 'दफ्तर' सादर करणार आहेत. तसेच निसर्ग कवी नलेश पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेता किशोर कदम, कवी अरुण म्हात्रे,सौमित्र हे काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर करतील. त्याचप्रमाणे पंडित शौनक अभिषेकी यांच्या बहारदार गीतांची मैफल सादर आहे.

या कार्यक्रमासाठी काही जागा वाचकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. मॅजेस्टीक बुकस्टॉल,शिवाजीमंदीर, दादर येथे कोणतेही मराठी पुस्तक खरेदी करा आणि विनामूल्य प्रवेशिका मिळवा. या कार्यक्रमात जागा मर्यादीत असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येईल, असे कार्यक्रमाचे संयोजक विनोद पवार यांनी कळविले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या