SHARE

हज यात्रेसाठी सातत्याने तीन वेळा अर्ज करूनही संधी न मिळालेल्या भाविकांना चौथ्या प्रयत्नात थेट संधी देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं अल्पसंख्यांक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं. हज हाऊस येथे कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा २०१८ साठी संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ३ हजारपेक्षा जास्त यात्रेकरूंना हज यात्रेची संधी देण्यात आली आहे. सातत्याने ३ वर्षे अर्ज करुन चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची योजना बंद करण्यात आली होती. मात्र समुदायाकडून मागणी होत असल्याने ती योजना पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


आर्थिक तरतूद वाढवणार

हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर असल्याने या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात येणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.


यात्रेकरूंच्या सबसिडीत वाढ

हज यात्रेकरूंना शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील वर्षी राज्यातील ९ हजार २४४ यात्रेकरूंना वाटा देऊन हज यात्रेची संधी देण्यात आली होती. केंद्र व राज्य शासनाने हा हिस्सा २० टक्क्यांनी वाढविला अाहे. त्यानुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३ हजारांनी वाढून ११ हजार ५२७ यात्रेकरूपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ