Advertisement

हवा 'मराठी लर्निंग अॅक्ट'! शिक्षक भारतीची भाषा बचाव मोहीम


हवा 'मराठी लर्निंग अॅक्ट'! शिक्षक भारतीची भाषा बचाव मोहीम
SHARES

आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे या शाळांमधून मराठी आणि हिंदीसह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचं संकट निर्माण झालं आहे. या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती आणि शिक्षक साहित्य संमेलन संस्थेने २१ फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन) ते २७ फेब्रुवारी (मराठी राजभाषा दिन) या सप्ताहात भाषा बचाव मोहीम सुरु केली आहे.


महाराष्ट्रात भाषा संकटात

मुंबईत आयसीएसई बोर्डाच्या अनेक शाळा असून या शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषा शिकण्याची संधी होती. मात्र नव्या वैकल्पित धोरणामुळे ही संधीच हिरावून घेतली गेली आहे. राज्य बोर्डाच्या ज्युनिअर कॉलेजमधून मराठी आणि प्रदेश भाषांना यापूर्वीच कमी महत्त्व देण्यात आलं आहे. तर राज्यातल्या माध्यमिक शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत / उर्दू / गुजराती या भाषा विषयांसाठी फक्त एकच शिक्षक देण्याचं धोरण सरकारने यापूर्वीच जाहीर केलं आहे.

त्यामुळे खुद्द महाराष्ट्रात मायबोली मराठीसह सर्वच भाषा संकटात आल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांचं भाषा कौशल्य हिरावलं जाणार असल्याचा दावा शिक्षक भारतीने केला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडण्याचा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



प्रकाश जावडेकर यांच्याकडून दखल

आयसीएसई बोर्डाच्या भाषा धोरणाविरोधात तीव्र आक्षेप घेणारं पत्र शिक्षक भारतीने केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठवलं आहे. त्यांनी येत्या २ आठवड्यात याबाबत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे.


मराठी लर्निंग अॅक्टची मागणी

महाराष्ट्रात मराठी लर्निंग अॅक्ट मंजूर करावा, अशी मागणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यापूर्वीच केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ शिक्षकांची राज्यव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. कवी कुसुमाग्रज जन्मदिनी ज्ञानेश्वर उद्यानात होणारं कवी संमेलन हा त्याच मोहिमेचा भाग आहे.

ज्ञानेश्वर उद्यानात होणाऱ्या कवी संमेलनाला मराठी, हिंदी, उर्दूतील अनेक मान्यवर कवीही हजेरी लावणार आहेत. 'माझ्या भाषेसाठी, माझी कविता', या संकल्पनेवर शिक्षक कवींनी आपली कविता एका छोट्या पोस्टरवर लिहून आणून ज्ञानेश्वर उद्यानात प्रदर्शित करावी, असं आवाहन संजय गवांदे आणि संजय शिंदे यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा