Advertisement

लो अटेंडन्स? नो टेन्शन!


लो अटेंडन्स? नो टेन्शन!
SHARES

मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांतील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्र परीक्षेला बसू दिलं जात नव्हतं. पण आता प्रथम आणि द्वितीय वर्ष बीकॉम आणि बीएच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांचं वर्षे वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना आयडॉलमधून परीक्षा देण्याची मुभा अखेर प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार प्रथम आणि द्वितीय वर्ष बीकॉम आणि बीएच्या विद्यार्थ्यांना १० मे रोजी नोंदणी करण्याचं परिपत्रक विद्यापीठाने सोमवारी ७ एप्रिलला जाहीर केलं आहे.

मुंबई विद्यापीठातील एनएम कॉलेज, मिठीबाई, केईएस श्रॉफ, तर दक्षिण मुंबईतील विल्सन कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांची वर्षभरातील उपस्थिती ही ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यानं कॉलेज प्रशासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मनाई केली असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान या निर्णयाचा विरोध करत अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाची हाक दिली होती. तर युवासेनेने देखील यासंदर्भात विद्यापीठाकडे धाव घेत या विद्यार्थ्यांचं वर्ष वाचवण्याकरता परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांची भेट घेत निवेदन दिलं होतं. दरम्यान याची योग्य ती दखल घेत विद्यापीठाने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.


उपस्थितीबाबतचा विद्यापीठ नियम

मुंबई विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर वर्गामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमीत कमी ७५ टक्के असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के नसेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येत नाही, असा विद्यापीठाचा नियम सांगतो. तसेच विद्यार्थी आजारी असल्यास, किंवा विद्यार्थी महाविद्यालयाच्या कोणत्याही स्तरावरील विशिष्ट स्पर्धेत प्रतिनिधित्व करत असल्यास त्याला काही प्रमाणात सुटही दिली जाते.


प्रवेशासाठी असा करा अर्ज

विद्यापीठाने जाहीर केलेल्या या परिपत्रकानुसार १० मे रोजी या विद्यार्थ्यांना आयडॉलमध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे. केवळ एकच दिवस ही संधी उपलब्ध राहणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका संबंधित कॉलेजांकडून आणाव्यात, अशी सूचना आयडॉलकडून देण्यात आली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नसल्यानं सर्वांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा