Advertisement

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची अजितदादांची मागणी


राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची अजितदादांची मागणी
SHARES

खासगी कंपन्यांना शिक्षणसंस्था चालवण्याची परवानगी देणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विधेयकाच्या प्रस्तावावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले असून मातृभाषा जपण्यासाठी त्यांनी अाता पुढाकार घेतला अाहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करा, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा यांनी केली अाहे.


मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळाच जास्त

सद्यस्थितीला मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणसंस्थांची संख्या जास्त अशी परिस्थिती अाहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर अाज जे विधेयक मांडत अाहेत, तेच लोकप्रतिनिधी यापुढे इंग्रजी शाळांची मागणी करतील. इंग्रजी शाळांची वाढ झाली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येवरही चर्चा करायला हवी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.


काही अामदारांना मराठी नीट वाचता येत नाही

काही शिक्षणसंस्था मराठी हा विषय एेच्छिक ठेवतात. त्यामुळे काही जण जर्मन, फ्रेंच भाषेचा विषय निवडतात. अाज बऱ्याच मुलांना मराठी नीट लिहिता-वाचता येत नाही. विधानसभेतील नव्या पिढीतील काही अामदारांनाही मराठी नीट वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती अाहे. काही अामदार तर मराठीचे इंग्रजीत अनुवाद करून येतात. मराठी नामशेष होईल, अशी वेळ एक ना एक दिवस तर नक्कीच येईल. त्यामुळे अंबानी किंवा अोबेराॅयची शाळा असो, कुणालाही न जुमानता मराठी विषय सक्तीचा करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.


राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता अालं पाहिजे

राज्यात राहणाऱ्या सर्वांना इंग्रजी, हिंदी आले पाहिजेच, परंतु आपली मातृभाषाही आली पाहिजे. जो या महाराष्ट्रात राहतो, त्याला मराठी लिहिता-वाचता आणि बोलता आलेच पाहिजे. नाहीतर आपण मायनॉरिटीमध्ये जाऊ, अशी भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केली.



मराठी विषय वाचवण्यासाठी प्राध्यापक उतरले रस्त्यावर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा