Advertisement

पुढचे तीन महिने अर्जुन घाटुळेच प्रभारी परीक्षा नियंत्रक


पुढचे तीन महिने अर्जुन घाटुळेच प्रभारी परीक्षा नियंत्रक
SHARES

मुंबई विद्यापिठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. घाटुळेंची मुदत गुरूवारी 16 नोव्हेंबरला संपणार होती. असे असताना निकालांचा गोंधळ कायम असल्याने आणि गेल्या तीन महिन्यांपासून घाटुळेच प्रभारी कार्यभार सांभाळत असल्याने घाटुळेंना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निकालांचा गोंधळ निस्तारत सर्व निकाल लावण्याचे मोठे आव्हान घाटुळे यांच्यासमोर असणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून पद रिक्तच!

विद्यापिठातील परीक्षा नियंत्रक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे. परीक्षा घेण्यापासून निकाल लावण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या परीक्षा नियंत्रकाकडून पार पाडल्या जातात. असे असताना इतके महत्त्वाचे पद गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असून प्रभारी परीक्षा नियंत्रकाच्या माध्यमातूनच परीक्षांचा आणि निकालाचा कारभार हाकला जात आहे.


विद्यापिठाला परीक्षा नियंत्रकच मिळेना!

नव्या विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा नियंत्रक पद हे 'परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक' असे करण्यात आल्याने या कायद्यानुसार ही नियुक्ती करावी लागणार आहे. मात्र सरकारकडून कायद्याची नियमावलीच जाहीर होत नसल्याने विद्यापिठाला कायमस्वरूपी परीक्षा नियंत्रक मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यापिठाचा कारभार प्रभारी परीक्षा नियंत्रकांच्याच हाती आहे आणि तोही निकालाचा गोंधळ सुरू असताना!


तीन महिन्यांसाठीच नेमले होते घाटुळेंना

निकालाच्या गोंधळानंतर तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांना हटवत त्यांच्या जागी घाटुळे यांना आणण्यात आले होते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे परीक्षा नियंत्रक असलेल्या घाटुळेंना मुंबई विद्यापिठाच्या परीक्षा नियंत्रकाचा प्रभारी पदभार तीन महिन्यांसाठी सोपवण्यात आला होता. ऑनलाईन मूल्यांकनामुळे झालेला गोंधळ निस्तरण्यासाठी घाटुळेंना आणण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी हा गोंधळ बऱ्यापैकी निस्तारला असला, तरी गोंधळ पूर्ण संपला नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, यापुढे होणाऱ्या परीक्षाही ऑनलाईन मूल्यांकन पद्धतीनेच होणार असल्याने, तसेच ऑनलाईन मूल्यांकनाचा अनुभव घाटुळे यांना असल्याने विद्यापिठाला त्याचा फायदा होणार असल्याचे म्हणत ही मुदतवाढ दिल्याचीही चर्चा आहे. तेव्हा आता घाटुळे हा निकालाचा गोंधळ पूर्णपणे कधी आणि कसा दूर करतात? हेच पाहाणे महत्त्वाचे ठरेल.हेही वाचा

उत्तरपत्रिका एकाची, फोटाेकाॅपी दुसऱ्याची, मुंबई विद्यापीठाचा नवा घोळ


संबंधित विषय