Advertisement

दहावीच्या निकालातही मुलींची बाजी!


SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी 13 जूनला दुपारी 1 वाजता जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 88.74 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.46 टक्के तर, मुलांचा निकाल 86.51 टक्के लागला आहे.

निकालाची विभागवार टक्केवारी
कोकण - 96.18
कोल्हापूर - 93.59
पुणे - 91.95
मुंबई - 90.09
औरंगाबाद - 88.15
नाशिक - 87.76
लातूर - 85.22
अमरावती - 84.99
नागपूर - 83.67

दादरच्या बालमोहन शाळेतील मराठी माध्यमातील अबोली बोरसे हिला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर, इंग्रजी माध्यमातील रिया वैद्य हि 99.40 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली आहे.

माझ्या यशाचे श्रेय कोणा एकाला देणे कठीण आहे. यामध्ये माझे शिक्षक, आई-वडील, बहिणी आणि मैत्रिणी या सगळ्यांचाच वाटा आहे. मला आता अतिशय आनंद होत आहे. आता माला नेमकं काय वाटतंय हे शब्दात सांगणं कठीण आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की, मला 100 टक्के मिळाले आहेत. मी कायम सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत राहिले, याचा मला फायदा झाला. कल्चरल कोट्याचेे वेगळे मार्क मिळाले. मी 11 वीला सायन्स शाखेत प्रवेश घेणार आहे. मला डॉक्टर व्हायचे आहे. आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत.

- अबोली बोरसे, मराठी माध्यमातील विद्यार्थिनी

माझी बहीणही याच शाळेची टॉपर होती. त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. माझ्या यशात माझ्या बहिणीचा खूप मोठा वाटा आहे. मी दररोज सात तास अभ्यास केला. त्याचे श्रेय आज मला मिळाले. माझ्या बहिणीने माझ्याकडून खूप मेहनत करुन घेतली. त्यामुळे मला आज 99 टक्के गुण मिळाले. मला पुढे आर्किटेक्ट व्हायचे आहे.
- रिया वैद्य, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी

पालिका शाळांचा निकाल 10 टक्क्यांनी घसरला - 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महापालिका शाळांच्या निकालात घसरण झाली आहे. यंदा महापालिका शाळेचा दहावीचा निकाल 68.90 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी मात्र 78 टक्के लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत पालिका शाळांचा निकाल दहा टक्क्यांनी घसरला आहे. महापालिकेच्या शाळेत 11,972 विद्यार्थ्यांनी 10 वीची परीक्षा दिली होती. त्यातील 8,249 विद्यार्थ्यीं 10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, 24 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळणार असून, 18 जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा