केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवले असून त्याच्या नोंदणीकरिता १ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. सीबीएसईद्वारे घेण्यात येणाऱ्या सेंट्रल टिचर एलिजिब्लिटी टेस्ट (C-TET) परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून यंदा ही परीक्षा देशातील २० भाषांमध्ये होणार आहे. तसचं शिक्षक बनण्यासाठी प्रतिक्षेत किंवा इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी जवळपास ९२ शहरांमध्ये परीक्षेचं केंद्र उपलब्ध असणार आहे.
ctet.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासोबतच सीबीएसईकडून उमेदवारांसाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज दाखल करायचे आहेत त्यांना सर्वप्रथम माहिती पुस्तक डाऊनलोड करून घ्यावं लागणार आहे. या माहितीपुस्तकात सर्व माहिती देण्यात आली असून उमेदवारांनी ते वाचूनच अर्ज भरावा अशी सूचना सीबीएसईद्वारे करण्यात आली आहे. १ ते २७ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून ३० ऑगस्टपर्यंत फी भरता येणार आहे.
या परीक्षेसाठी २२ जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात येणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळं ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तसंच सीबीएसईद्वारे १६ सप्टेंबर २०१८ या दिवशी सी-टीईटी परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आल्यानं परीक्षेच्या तारखेतही बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा -
पेपर तपासणीच्या कामात एकसमानता येणार
अकरावीची शेवटची गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला