Advertisement

मुंबईच्या १५० गरीब विद्यार्थ्यांना सरकारची १२ हजारांची शिष्यवृत्ती!

सायन येथील डीएस हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

मुंबईच्या १५० गरीब विद्यार्थ्यांना सरकारची १२ हजारांची शिष्यवृत्ती!
SHARES

मुंबईतील सायन परिसरातील डीएस हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि धारावी, प्रतिक्षानगर, चुनाभट्टी यांसारख्या मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या पाल्याची शाळेची फी वेळेवर भरता येत नाही. मात्र, आता त्यातल्या काही पालकांना दिलासा मिळणार असून सायन येथील डीएस हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.


चार वर्षांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

मुंबईतील सायन, धारावी, प्रतिक्षानगर आणि चुनाभट्टी परिसरात अनेक गरीब विद्यार्थी राहत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. दरम्यान, या ठिकाणी राहणारी बरीचशी मुले ही डीएस हायस्कूलमध्ये शिकणारी असून शैक्षणिक खर्च कसा करावा? हा प्रश्न त्यांना नेहमीच भेडसावत असतो. त्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारने तोडगा काढला असून या शाळेतील ५३ विद्यार्थ्यांना प्रती वर्षी १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी देण्यात येणार आहे.


गरीब विद्यार्थ्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण सुलभरीत्या व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. त्याद्वारे दरवर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात असून या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा आमच्या शाळेच्या ५३ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यात निवड झाल्याने आम्हाला निश्चितच याचा आनंद आहे.

अंकुश महाडिक, मुख्याध्यापक, डीएस हायस्कूल


३ नोव्हेंबर २०१७ ला बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी असे दोन मुख्य पेपर होते. शाळेतील अनेक विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असल्याने ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हावेत व त्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आम्ही सलग चार महिने शाळा सुटल्यावर दररोज दोन तास विशेष तयारी करून घेत होतो.

आदेश पाटील, शिक्षक, डीएस हायस्कूल


मुंबईतून १५० विद्यार्थ्यांची निवड

अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीद्वारे देण्यात येणारी रक्कम ही फक्त सहा हजार रुपये होती. मात्र या वर्षापासून ही रक्कम दुप्पट म्हणजेच १२ हजार इतकी करण्यात आली आहे. तसेच नववी ते बारावी अशी सलग चार वर्षे या ५३ विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये ही रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे स्टेट बँकेत खातीही उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी दिली. मुंबईत एकूण १५० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.



हेही वाचा

३३ टक्के मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा