आॅनलाइन तक्रार नोंदवायची कुठे? इंजिनीअरिंग काॅलेजांचा नियमाला हरताळ

इंजिनिअरिंग कॉलेजातील वेबसाईटवर तक्रार निवारण प्रक्रिया सुरु नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना अर्जाबाबतच्या तक्रारीसाठी संबंधित कक्षाकडे जावं लागत असल्याने विद्यार्थी त्यावर संताप व्यक्त करत आहेत.

SHARE

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सध्या सर्व लहानमोठ्या शैक्षणिक संस्था आॅनलाईन आल्या आहेत. आपापल्या संस्थेच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या तक्रारींचं निराकारण करण्यातही या संस्था पुढाकार घेत आहेत. याला अपवाद म्हणावा लागेल, तो इंजिनीअरिंग काॅलेजातील वेबसाईट्सचा.

इंजिनिअरिंग कॉलेजातील वेबसाईटवर तक्रार निवारण प्रक्रिया सुरु नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना अर्जाबाबतच्या तक्रारीसाठी संबंधित कक्षाकडे जावं लागत असल्याने विद्यार्थी त्यावर संताप व्यक्त करत आहेत.


नियमांना हरताळ

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात यावी आणि त्याविषयीची माहिती दिसेल, अशा भागात लावावी, असा नियम केला आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण कमीत कमी वेळेत व्हावं, हा यामागचा उद्देश आहे. परंतु इंजिनीअरिंग कॉलेज या नियमाला हरताळ फासताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा नियम बनवून दीड वर्षे उलटली, तरीही कॉलेजांना जाग आलेली नाही.


तक्रार निवारणासाठी कमिटी

काही कॉलेजांनी ऑनलाइन तक्रार प्रणाली बनवली असली तरी त्याबद्दल फार कमी विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि ही माहिती दिसेल अशा भागात लावण्याची तसदीही कॉलेज घेत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहे. त्याशिवाय काही कॉलेजमध्ये ऑफलाइन तक्रार निवारणासाठी कमिटी तयार करण्यात आली असून त्याची माहिती कॉलेजांनी वेबसाइटवर दिलेली आहे.


कमिटीत कोण?

या तक्रार निवारण समितीमध्ये कॉलेजचे वरिष्ठ प्राध्यापक तसंच व्यवस्थापन कमिटीमधील सदस्य असतात. त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी लागते किंवा समक्ष तक्रार निवारण समितीमधील सदस्यांना भेटून तक्रार सांगावी लागते. हे सर्व टाळण्यासाठी ऑनलाइन निवारण प्रणाली सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु याचं महत्त्व कॉलेजांना पटत नसल्याने त्यांनी ऑनलाईन निवारण प्रणाली सुरू करणं टाळलं आहे.


पोर्टल सुरू करावं

विशेष म्हणजे काही कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रार निवरणासाठी अल्प शुल्क आकारले जात असल्याची अनेकदा तक्रार असली तरी विद्यार्थी लेखी तक्रार देत नाहीत किंवा तक्रार निवारण समिती सदस्यांना भेटून तक्रार करत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मुलभूत सुविधांबाबत तक्रारी करण्यासाठी पोर्टल सुरू करावं, अस मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.


इंजिनीअरिंग कॉलेजातील वेबसाईटवर तक्रार निवारण प्रक्रिया सुरु नसल्याने बऱ्याच विद्याथ्यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असून ते सर्व इंजिनीअरिंग कॉलजांना पाठवण्यात येणार आहे.

- डॉ अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय


हेही वाचा-

'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोका, मुंबई उच्च न्यायालयाची नाराजीसंबंधित विषय