Advertisement

Exclusive Interview: अथक मेहनतीनेच बनलो मुंबईतून टाॅपर- खुशाल राठी

एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम गटातून २०० पैकी १९१ गुण मिळवत खुशाल विनोद राठी या विद्यार्थ्यांने मुंबईतून प्रथम येण्याचा मान मिळवला. भाईंदरमध्ये राहणाऱ्या खुशाल राठीने हे यश कसं मिळवलं, त्यामागची त्याची मेहनत जाणून घेण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने त्याच्यासोबतच साधलेला खास संवाद.

Exclusive Interview: अथक मेहनतीनेच बनलो मुंबईतून टाॅपर- खुशाल राठी
SHARES

राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषीविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत पीसीएम गटातून २०० पैकी १९१ गुण मिळवत खुशाल विनोद राठी या विद्यार्थ्यांने मुंबईतून प्रथम येण्याचा मान मिळवला. भाईंदरमध्ये राहणाऱ्या खुशाल राठीने हे यश कसं मिळवलं, त्यामागची त्याची मेहनत जाणून घेण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने त्याच्यासोबतच साधलेला खास संवाद.


निकाल पाहून आश्चर्यचकीत झालास का ?

खुशाल- एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल खरंतर ४ जूनला लागणार होता. मात्र काल अचानक निकाल लागला. मी माझ्या मोबाइलवर हा निकाल बघितला. मला २०० पैकी १९१ गुण मिळाल्याचं बघून खूप आनंद झाला. माझ्यासाठी नक्कीच हा सुखद धक्का होता.



राज्यातून दुसरा आणि मुंबईतून पहिला येशील असं वाटलं हाेतं का ?

खुशाल- मला खरंतर प्रसारमाध्यमांकडून आणि सरांकडून मला समजल की, मी मुंबईतून पहिला आलो आहे. त्यानंतर थोड्याच वेळाने मी महाराष्ट्रातून दुसरा आलो हे कळताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी स्वत:ला पूर्णपणे झोकून देत या परीक्षेचा अभ्यास केला. या परीक्षेत यश मिळेल, याची मला खात्री देखील होतील, पण राज्यातून दुसरा अन् मुंबईतून पहिला येईल, असं खरंच वाटलं नव्हतं.


तुझ्या यशाचं रहस्य काय ?

खुशाल- कोणत्याही परीक्षेत तुम्ही अथक मेहनत घेतली, तर तुम्हाला त्याच फळं मिळत यावर माझा विश्वास आहे. दहावीच्या वेळेसही मी याच पद्धतीने मेहनत घेतली होती, त्यावेळेस मला ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले होते. त्यानंतर ११ वी आणि १२ सुरू असताना जेईई मेन- अॅडव्हान्स, आणि एमएचटी-सीईटी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. मागील २ वर्षांपासून मी या परीक्षेची तयारी करत होतो. घरी ७ ते ८ तास आणि कोचिंग क्लासमध्ये जवळपास ४ ते ५ तास नियमित अभ्यास केला. या मेहनतीचंच फळ मला मिळालं.



तुझ्या यशाचं श्रेय कुणाला देशील ?

खुशाल- माझ्या यशामागे 'द सायन्स प्रायव्हेट हब' क्लासचे हितेश बेचरा, परिमल पटेल, प्रणव गांधी, ज्ञानप्रकाश पांडे सर या चौघांची मोठी मेहनत आहे. ते माझ्यासाठी केवळ सर नसून माझ्या माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. सीईटी परीक्षा देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेतील प्रत्येक पेपरसाठी माझी कसून तयारी करून घेतली. त्यामुळेच माझ्या यशाचं श्रेय मी या चौघांना देईन.


परीक्षेत काही अडचणी आल्या का ?

खुशालमी एमएचटी-सीईटी ही परीक्षा पहिल्यांदाच दिली असली, तरी मला ही परीक्षा फार कठीण गेली नाही. या परीक्षेतील पीसीएम गटात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित हे तीन विषय असतात. या तिन्ही विषयात मला विशेष रुची असल्याने हे पेपर मी अत्यंत सहजपणे साेडवले. या तिन्ही विषयांत मला सारखेच गुण मिळाले आहेत.


भविष्यात कशात करियर करायचं आहे ?

खुशाल- देशातील नामवंत शिक्षणसंस्था आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे. तिथं कम्प्युटर सायन्समध्ये मला करियर करायचं आहे. त्यासाठी मी आयआयटीची प्रवेशपरीक्षा देखील दिली आहे. या परीक्षेचा निकाल येत्या १० जून रोजी लागणार आहे.



हेही वाचा-

एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

१२वी फेरपरीक्षेच्या अर्जाची तारीख जाहीर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा