Advertisement

वैद्यकीय प्रवेशात परप्रांतीयांची घुसखोरी, राज्यातील विद्यार्थ्यांचा अारोप


वैद्यकीय प्रवेशात परप्रांतीयांची घुसखोरी, राज्यातील विद्यार्थ्यांचा अारोप
SHARES

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही मुंबईतील महाविद्यालयांकडून प्रवेश नाकारण्यात येत असून ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा अारोप विद्यार्थी अाणि पालकांनी केला अाहे. सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर विद्यार्थी अाणि पालकांनी भेट घेऊन अापली व्यथा मांडली. राज ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, असं साकडं त्यांनी घातलं. 




नेमकं प्रकरण काय

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईतील हजारो विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असणाऱ्या अभिमत विद्यापीठ आणि खासगी कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी धाव घेतली. मात्र प्रवेश आधीच फुल्ल झाल्याचं सांगत या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यातं आले. परंतु त्याचवेळी दिल्ली, आंधप्रदेश, तमिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांना मुंबईतील कॉलेजांमध्ये प्रवेश दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.  यंदा राज्यातील नीटसाठी १ लाख ८२ हजार २१८ विद्यार्थी बसले होते. यामधील ७० हजार १८४ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले असून राज्यात फक्त ६२४५ जागा उपलब्ध अाहेत.

प्रवेशाची नियमावली काय

वैद्यकीय कॉलेजांमधील प्रत्येक कॉलेजमध्ये १०० टक्क्यांपैकी ८५ टक्के कोटा हा त्या संबंधित राज्यासाठी आणि उरलेला १५ टक्के कोटा हा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतो. तसंच इतर राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र गरजेचं असतं. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या इतर राज्यातील या विद्यार्थ्यांनी मुंबईतील कॉलेजांमधून दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि त्यामुळेच त्यांना हे प्रवेश मिळत आहे. इतकंच नाही प्रवेश मिळालेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात केवळ २ ते ३ वर्ष वास्तव्याला असूनही त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्रही आहे. मात्र, अधिवास प्रमाणपत्रासाठी १५ वर्ष वास्तव्य असण्याची अट अाहे. याचा अर्थ परप्रांतीय विद्यार्थ्यांकडे बोगस अधिवास प्रमाणपत्र असल्याचं राज्यातील विद्यार्थ्यांचं म्हणणं अाहे.
 

राज यांच्याकडून अाश्वासन

या सर्व प्रकरणानंतर संतप्त पालकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली समस्या व अडचणींचा पाढा वाचून दाखवला. तसंच या समस्या सोडवण्यासाठी त्यांना साकडं घातलं.  यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करू असं आश्वासन दिलं.


माझ्या मुलीने नीटची परीक्षा दिली असून तिला ७२०  पैकी ३५९  गुण प्राप्त झाले आहेत. तिला पुढे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु वैद्यकीय प्रवेशात परप्रांतीयांनी घुसखोरी केल्यानं तिला प्रवेश घेण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत.
- आशा बनकर, पालक



हेही वाचा - 

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, तांत्रिक कारणास्तव दुसरी यादी पुढे ढकलली

एफवायची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा