Advertisement

'यूजीसी'चा 'तो' निर्णय रद्द करा' - आदित्य ठाकरे


'यूजीसी'चा 'तो' निर्णय रद्द करा' - आदित्य ठाकरे
SHARES

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चुकीच्या आणि अन्यायकारक निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ची मान्यताच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. त्यामुळे यूजीसीने आपला निर्णय ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे.


नेमक प्रकरण काय?

काही कारणांनी ज्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेता येत नाही, किंवा काहींना नोकरी करताना शिक्षण घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठानं दूर आणि मुक्त शिक्षण संस्था म्हणजेच आयडॉलची स्थापना केली. या संस्थेत अनेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी सुमारे ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) देशातील दूर आणि मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचं नाव नसल्यानं विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षणावर टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे ‘आयडॉल’च्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

यूजीसीने घेतलेला निर्णय अन्यायकारक आणि चुकीचा आहे. यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचं वर्ष फुकट जाईल. त्यामुळे केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यूजीसीचा निर्णय रद्द करून मुंबई विद्यापीठाचा ‘आयडॉल’ विभाग सुरू ठेवला पाहिजे.
- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, युवासेना


३० दिवसांत बाजू मांडा!

मुंबई विद्यापीठाच नॅक मूल्यांकन रखडल्यानेच ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अनेक मुक्त विद्यापीठांनी यूजीसीकडून मान्यता न घेताच अभ्यासक्रम सुरू केल्याच निदर्शनास आल्याने यूजीसीने नियमानुसारच ही मान्यता रद्द केल्याचे समजते. दरम्यान, मान्यता रद्द होण्याची शक्यता असणाऱ्या मुक्त विद्यापीठांना पुढील ३० दिवसांत आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा