Advertisement

आयटीआयला विद्यार्थ्यांची वाढती पसंती


आयटीआयला विद्यार्थ्यांची वाढती पसंती
SHARES

राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश यंदा केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेमार्फत करण्यात आलं. ही प्रक्रिया नुकतीच संपली असून या प्रक्रियेंतर्गत राज्यभरातील आयटीआयमध्ये ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती दाखवली आहे.


इतक्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

आयटीआय प्रवेशासाठी यंदा ९४ हजार २४८ जागा उपलब्ध होत्या. या ऑनलाइन प्रक्रियेत चार फेऱ्या राबावण्यात आल्या. यातील चारही फेऱ्या जाहीर झाल्या असून त्यात सुमारे ९१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केला आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९६.६८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत

गेल्या वर्षी या आयटीआयमध्ये ९२.४३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या ४.२५ टक्के अधिक आहे. खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार ६९ जागा उपलब्ध असून, संस्था स्तरावर जागा भरण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. खासगी संस्थांमधील जागाही मोठ्या प्रमाणात भरण्यात येणार असल्यानं आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लाखांवर पोहचली आहे.


डिप्लोमाचा ओढ कमी

दहावीचे निकाल लागल्यानंतर सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आयटीआयचा पर्याय 'सर्वात शेवटचा' असेल असा कयास होता. मात्र आता तो बदलला असून याउलट डिप्लोमाचा ओढ कमी होताना दिसत आहे. यावर्षी पॉलिटेक्निकला एक लाख ३० हजार ८०० जागा उपलब्ध असून, त्यासाठी अवघे ५७ हजार ९९७ अर्ज आले आहेत. यापैकी प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे.

आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, डिझेल मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट इत्यादी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचं दिसून येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा