Advertisement

दहावी-बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केलेली नाही, मंडळाकडून खुलासा

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तेव्हा विद्यार्थी-पालकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दहावी-बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केलेली नाही, मंडळाकडून खुलासा
SHARES

सध्या दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्याच्या बातम्या साेशल मीडियावर फिरत आहेत. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. तेव्हा विद्यार्थी-पालकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

पत्रक जारी

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (पुणे) सचिव डॉ.अशोक भोसले यांनी पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे निकालासंदर्भांत सोशल मीडियावरुन पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विश्वास ठेऊ नये.

फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख महामंडळाच्या अधिकृत इमेलद्वारे, महामंडळाच्या संकेतस्थळावरुन तसंच प्रसिद्धी माध्यमांद्वारे सर्वांना कळविण्यात येईल.

हेही वाचा - १०वी-१२वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीचं ८५ टक्के काम पूर्ण

८५ टक्के काम पूर्ण

दरम्यान, दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाचं काम ८५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. राज्य मंडळाच्या एकूण ९ विभागीय मंडळापैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. लॉकडाऊनमुळं उत्तरपत्रिका तपासणीसाठी अडथळे येत होते. परंतु, विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेत उत्तरपत्रिका तपासण्याचं काम जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. मुंबई विभागानं आपल्या कामाची सुरुवात पालघर जिल्ह्यांपासून करत नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापर्यंत केली आहे.

आपत्कालीन व्यवस्था

मुंबईत आणि मुंबई बाहेर अडकलेल्या तपासणीकांपर्यंत उत्तरपत्रिका पोहोचवण्यासाठी त्यांच्या आपत्तकालीन पासची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व व्यवस्था मुंबई विभागीय मंडळाने राज्य सरकार, शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केली. यासाठी मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरची देखील वाढ केली. सद्यस्थितीत तरी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांचा निकाल कधी लागेल याबाबत अद्याप निश्चित काहीही सांगता येत नाही. 

हेही वाचा - नवी मुंबई पालिकेच्या शाळा सोमवारपासून ऑनलाईन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा