ऑनलाईन असेसमेंटसाठी अखेर कंपनीची निवड

  Kalina
  ऑनलाईन असेसमेंटसाठी अखेर कंपनीची निवड
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापिठाच्या ऑनलाईन असेसमेंटसाठी अखेर ‘मेरीटट्रॅक’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी जलदगतीने व्हावी आणि विद्यार्थ्यांचे निकाल वेळेकर लागावेत यासाठी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ऑनलाईन असेसमेंटची घोषणा केली होती. त्यामुळे एप्रिलपासून होणाऱ्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन असेसमेंटद्वारे जवळपास 2 लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

  उत्तरपत्रिका तपासणीमध्ये वेळ वाया जातो. त्यामुळे निकाल उशिरा लागतो. त्याचप्रमाणे पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणी केली जाणार आहे. विद्यापिठाने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र पहिल्यांदा केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग घेतल्यामुळे निविदा प्रक्रियेची मुदत दोन वेळा वाढवण्यात आली. अखेर तीन कंपन्यांच्या निविदा आल्यानंतर त्यातून ‘मेरीटट्रॅक’ या कंपनीची निवड करण्यात आली.

  विद्यापिठाने तात्काळ अंमलबाजवणीसाठी कलिना कॅम्पसच्या परिसरात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 50 स्कॅनर बसवण्यात आले आहेत. एका स्कॅनरवर दीड हजार उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जाणार आहेत. या कामासाठी कंपनीकडून 50 अधिकारी आणि 200 कर्मचारी काम करणार आहेत. हे सर्व काम सीसीटीव्ही आणि बायोमॅट्रिक एक्सेसच्या निगराणीखाली पार पडणार आहे. ऑनस्क्रीन मार्किंगचे काम 142 कॅम्प सेंटरमध्ये केले जाणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीला 4 मे पासून सुरुवात केली जाईल. यासाठी गेले तीन दिवस 50 महाविद्यालयातील शिक्षकांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या प्रक्रियेमुळे निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.