Advertisement

मुंबई विद्यापीठाचे उर्वरित निकालही लवकरच लागणार!


मुंबई विद्यापीठाचे उर्वरित निकालही लवकरच लागणार!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात प्रचंड निकाल गोंधळ झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांत निकालाचा गोंधळ काही प्रमाणात कमी झालाअसून आतापर्यंत हिवाळी सत्र परीक्षांचे सर्व महत्त्वाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातच विद्यापीठातर्फे बुधवारी एमकॉम पार्ट-२ चा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यापीठाने आतापर्यंत एकूण ४०२ निकाल जाहीर केले आहेत. मात्र अद्याप काही निकाल जाहीर होण शिल्लक असून हे निकालही लवकरच जाहीर करण्यात येईल, असं परीक्षा व मूल्यमापन विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.


निकालांना यंदाही लेटमार्क

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे यंदाच्या हिवाळी सत्र परीक्षांसाठी एकूण ४०२ मुख्य परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यापैकी काही निकाल ४५ दिवसांत जाहीर करण्यात आले असले, तरी बहुतांश निकालांना यंदाही विद्यापीठाने लेटमार्क लावला. त्यात प्रामुख्याने लॉ शाखेच्या निकालाचा समावेश होता. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि निवेदनाची मदत घेत निकालासाठी परीक्षा विभागाकडे विनवणी केली.


नवे कुलगुरू आणि निकाल

काही दिवसांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती झाली. नवीन कुलगुरूंनी रखडलेल्या निकालाकडे विशेष लक्ष देत प्राचार्यांसह परीक्षा विभागातील अधिकारी मंडळींची बैठक घेतली आणि निकाल कामांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर निकालासंबंधी कामांचा वेग वाढला असून लॉ शाखेसह इतर महत्त्वाच्या निकालांची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली आहे. एमकॉम पार्ट-२ या अभ्यासक्रमाचा निकालही जाहीर करण्यात आला आहे.


४०२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे आतापर्यंत ४०२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अद्याप एमकॉम सेमिस्टर-३ सह काही अभ्यासक्रमांचे निकाल बाकी आहेत. या निकालांचं कामही सध्या अंतिम टप्प्यात आलं असून २५० ते ३०० उत्तरपत्रिका तपासणे बाकी असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उर्वरित निकालाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा