Advertisement

मुंबईचे 'गोंधळी' विद्यापीठ!

पालकांच्या नजरेतून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रभाव टाकणारा, प्रसंगी विद्यार्थ्यांना न्यायालयात धाव घ्यायाला लावणारा आणि शिक्षकांच्याही आयुष्याशी जोडलेला विद्यापीठाचा गोंधळ कायम लक्षात राहणार आहे. या गोंधळाचा आवाका इतका होता, की त्याचे थेट पडसाद विधानभवन, विधानपरिषदेमध्ये पडले आणि अधिवेशन घुसळून निघाले.

मुंबईचे 'गोंधळी' विद्यापीठ!
SHARES

सरत्या वर्षात मुंबईकरांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा ठरला तो मुंबई विद्यापीठाचा 'गोंधळ'. पालकांच्या नजरेतून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रभाव टाकणारा, प्रसंगी विद्यार्थ्यांना न्यायालयात धाव घ्यायाला लावणारा आणि शिक्षकांच्याही आयुष्याशी जोडलेला विद्यापीठाचा गोंधळ कायम लक्षात राहणार आहे. या गोंधळाचा आवाका इतका होता, की त्याचे थेट पडसाद विधानभवन, विधानपरिषदेमध्ये पडले आणि अधिवेशन घुसळून निघाले.


१३०० शाळांना बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

तशा तर शिक्षण क्षेत्रात सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. शाळांचे कंपनीकरण करण्याचा नवा प्रस्ताव राज्य सरकारने आणला आणि सकारत्मक दृष्टीने लोकांसमोर मांडला. याचसोबत सगळ्यांनाच हादरवून टाकणारा १३०० शाळा बंद करण्याचा निर्णयही शालेय शिक्षण विभागानेच घेतला. यामुळे विविध स्तरातून शिक्षण विभागावर ताशेरे ओढले गेले, प्रश्न ही उपस्थित झाले. इतकेच काय, पण राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने याची दखल घेतली आणि थेट राज्य सरकारलाच या संदर्भात नोटीस धाडली. मात्र, आपला निर्णय योग्य असून आम्ही आमची भूमिका तटस्थपणे मांडू, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.


समायोजनाचा प्रश्न आणि डिजिटायझेशन

अनेक ठिकाणी नेट, संगणक अशा सुविधा नसतानाही डिजिटलायझेशनचा आग्रह धरल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. एकीकडे ऑनलाईन कामांमुळे आजही शिक्षक ग्रासलेला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या मागची अशैक्षणिक कामे काही पिच्छा सोडत नाहीत, हे सरत्या वर्षातही दिसून आले. समायोजनाच्या प्रश्नाने हैराण शिक्षकांना काही ठिकाणी आंदोलने, उपोषणे करावी लागली आहेत. विनाअनुदानित शाळांना हेच केल्यानंतर आता कुठे २० टक्के अनुदानाचा मार्ग यावेळी मोकळा झाला आहे. याच वर्षात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी सोप्या शिक्षण पद्धतीचे अनेक मार्ग अवलंबले आणि विद्यार्थ्यांसाठी ते सुलभ केले. शिक्षणाच्या वाऱ्यांनी शिक्षकांसह विद्यार्थीही समृद्ध झाले.


ऑनलाईनचा फायदा कमी, त्रासच जास्त

ऑनलाईन होण्याचा मार्ग शालेय शिक्षण विभागासह विद्यापीठानेही अवलंबला. मात्र, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना न होता त्रासच झाला. मुंबई विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात येत आहेत. पण यंदा अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाशी सुमारे आठशे महाविद्यालये संलग्नित असून सुमारे सात लाख विद्यार्थी आहेत. मात्र, ऑनलाईन निकालाच्या निमित्ताने विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, प्रशासनातील त्रुटी, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय समोर आला.


प्रत्यक्ष कुलगुरूंचीच हकालपट्टी

विद्यापीठाच्या वर्षातील सगळ्यात वाईट घटना म्हणजे विद्यार्थ्यंचे निकाल वेळेत न लावल्याने खुद्द कुलगुरुंची हकालपट्टी करण्यात आली. मेरीट ट्रॅक कंपनीला नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेले काम समोर आल्यानंतर विद्यापीठाच्या नावावर कलंक लागल्यासारखे झाले. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर, नोकरी या गोंधळामुळे पणाला लागली होती आणि विशेष म्हणजे हा अभूतपूर्व गोंधळ अद्यापही सुरू आहे. त्यामुळे नवीन वर्षात तरी विद्यापीठ हा गोंधळ निस्तरणार का? आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


१६० वर्षांची प्रतिमा ढासळली

शैक्षणिक कार्य किंवा संशोधनाच्या नावाने 'आनंद' असणाऱ्या लोकांनीच विद्यापीठात अनागोंदी कारभार आणला आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदीर्घ अशी १६० वर्षांची परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाची प्रतिष्ठा ढासळली असली, तरीही यासाठी एकटे कुलगुरू किंवा निवडप्रक्रिया, ऑनलाईन निकालाला लागलेला लेटमार्क, पेपरफुटी एवढीच करणे नसून इतरही बरीच कारणे आहेत. विद्यापीठाचा कारभार नीट चालण्यासाठी 'महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या'ची नीट अंमलबजावणी व्हायला हवी, तरच विद्यापीठाची प्रतिष्ठा सावरू शकेल, अशी अपेक्षा नवीन वर्षात आहे.


संबंधित विषय