Advertisement

द्वीतीय सत्रातील परीक्षांसाठी विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार!

मुंबई विद्यापीठाने मास्टर प्लान तयार केला असून, सदोष आणि जलद निकालांसाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. प्रथम सत्रात झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, या दृष्टीने या प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत. द्वीतीय सत्रात एकूण सर्व शाखांमध्ये मिळून ६०४ परीक्षा घेण्यात येणार आहेत. ४१ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत.

द्वीतीय सत्रातील परीक्षांसाठी विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार!
SHARES

मुंबई विद्यापीठाने टीवायच्या परिक्षांनंतर झालेल्या गोंधळातून चांगलाच धडा घेतलाय. पुन्हा ऑनलाईन असेसमेंटमुळे निकाल रखडू नयेत, यासाठी मुंबई विद्यापीठाने मास्टर प्लान तयार केला असून, सदोष आणि जलद निकालांसाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. प्रथम सत्रात झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, या दृष्टीने या प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत. द्वीतीय सत्रात एकूण सर्व शाखांमध्ये मिळून ६०४ परीक्षा घेण्यात येणार आहेत. ४१ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन मूल्यांकनापासून ते निकालापर्यंतची प्रक्रिया बदलण्यात आली आहे.


संगणकीकृती माहिती तयार

सर्व परीक्षांच्या संगणकाधारित मूल्यांकनासाठी विद्यापीठाने मास्टर डेटाबेस तयार केला आहे. हा डेटाबेस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या डेटाबेसमध्ये टॅगिंगसाठी लागणाऱ्या वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. या डाटामध्ये १४००० शिक्षकांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये तयार करण्यात आली आहे. या माहितीमध्ये शिक्षकांचे मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर व इतर माहिती देण्यात आली आहे.


५ दिवसांच्या आत स्कॅनिंग होणार

प्रथम सत्राच्या परीक्षांमध्ये विविध परीक्षाकेंद्रांवरुन परीक्षा झाल्यानंतर ६ ते १२ दिवसांनंतर उत्तरपत्रिका परीक्षा विभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे हे दिवस वाया जाऊ नयेत, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्राला ३ दिवसांच्या आत उत्तरपत्रिका परिक्षा विभागाकडे येणे बंधनकारक केले आहे. त्यानंंतर पुढील दोन दिवसांत उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे.


स्कॅनरच्या संख्येत वाढ

या मास्टरप्लॅनमध्ये २० बारकोड गनिंग स्टेशन्स तयार करण्यात आले आहेत. त्यात ४५ लोकांचा समूह याकरता कार्यरत असणार आहे. प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी वापरलेल्या ६० स्कॅनरच्या संख्येत वाढ करुन ती ६५ एवढी करण्यात आली आहे. तेव्हा प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी कमाल ५० हजाराची स्कॅनिंग क्षमता होती, ती वाढवून आता दररोज ६० हजारांवर उत्तरपत्रिका स्कॅनिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


पुरवणी बंदच

दरम्यान, ऑनलाईन असेसमेंटमवेळी अनेक उत्तरपत्रिकांच्या पुरवण्याच गहाळ झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यामुळे आता परीक्षार्थींना पुरवण्याच देण्यात येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठाने कायम ठेवला आहे. ४० पानी उत्तरपत्रिका सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी पुरेशी असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.


यावेळी प्रशिक्षणावर जोर

विद्यापीठाने द्वितीय सत्राच्या सर्व परीक्षांच्या संगणकाधारीत मूल्यांकनासाठी प्रशिक्षणावर भर दिला आहे. या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये २६ ऑक्टोबर २०१७ला फोर्ट कॅम्पसमध्ये अधिष्ठाता, अभ्यासमंडळ, अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची बैठक घेण्यात आली होती. 

या बैठकीत सर्व परीक्षांच्या संगणकाधारीत मूल्यांकनाचा आढावा घेण्यात आला. तर १० नोव्हेंबरला रत्नागिरी सब कॅम्पस येथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचार्य, कॅपसेंटरचे कर्मचारी, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ११ नोव्हेंबरला रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शिक्षक, प्राचार्य आणि सहभागी वर्गांची बैठक घेण्यात येणार आहे. तर १४ नोव्हेंबरला मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील प्राचार्य, शिक्षक आणि सहभागी वर्गांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


ऑनलाईन व्हिडिओ करणार मार्गदर्शन

यावेळी ऑनलाईन ट्रेनिंगसाठी खास व्हिडियो तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांना ट्रेनिंग घेता येणार आहे. एखादी उत्तरपत्रिका तपासताना काही अडचण आल्यास हा व्हिडिओ शिक्षकांना उपयोगी ठरेल. तसेच, या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेबाबत माहिती देण्यात येणार आहे.


शिक्षकांसाठी खास हेल्पडेस्क

संंगणीकृत उत्तरपत्रिका मूल्यांकनावेळी शिक्षकांच्या अडचणींची उत्तरे देण्यासाठी विद्यापीठाने खास हेल्पडेस्क तयार केला आहे. या हेल्पडेस्कवर टेक्निकल क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असणार आहेत.



हेही वाचा

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा