Advertisement

वैद्यकीयच्या परीक्षांना स्थगिती नाहीच, हायकोर्टाने पुन्हा फेटाळली 'त्या' विद्यार्थ्यांची याचिका

वैद्यकीय पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती देण्याची याचिकादारांची तातडीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

वैद्यकीयच्या परीक्षांना स्थगिती नाहीच, हायकोर्टाने पुन्हा फेटाळली 'त्या' विद्यार्थ्यांची याचिका
SHARES

वैद्यकीय पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती देण्याची याचिकादारांची तातडीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकादार हे अत्यंत शेवटच्या क्षणी येऊन स्थगिती मागत असल्याने ही विनंती मान्य करता येणार नाही, असं न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटलं आहे. या परीक्षा मंगळवार ८ सप्टेंबर सुरू होत आहेत. (no stay on medical exams as bombay high court rejects students plea)

राज्याच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर अशा विविध भागात राहणाऱ्या ९ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वैद्यकीय पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती देण्याची तातडीची जनहित याचिका केली आहे. राज्यात कोरोनाचं संकट कायम असून प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं आहे, त्यामुळे या परीक्षांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली. 

या याचिकेवर न्या. अमजद सय्यद व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास ८ लाखांच्या घरात आहे. त्यातील साधारणत: २ लाख हे सक्रिय रुग्ण आहेत आणि कोरोनामुळे २५ हजारच्या आसपास मृत्यू झाले आहेत. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकड होत असल्याने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा घेण्याच्या विद्यापीठाच्या २१ ऑगस्टच्या परिपत्रकाला तातडीची स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.

हेही वाचा - कोरोना संकटात झाली इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा

त्यावर मुख्य सरकारी वकील पी. पी. काकडे व सरकारी वकील मनीष पाबळे यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनच परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करत असल्याची माहिती खंडपीठाला दिली. 

नीट व जेईई परीक्षेला कोरोना संकटाच्या कारणामुळे स्थगिती देण्याची विनंती नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. तसंच ९ विद्यार्थ्यांनी केलेली ही याचिका सर्वच विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व मानले जाऊ शकत नाही, असा युक्तिवादही सरकारी वकिलांनी केला.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर खंडपीठाने याचिकादारांनी अत्यंत शेवटच्या क्षणी येऊन ही विनंती केल्याने परीक्षेला तातडीने स्थगिती देता येणार नाही. तसंच याचिकादारांचं म्हणणे हे सर्व विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक असल्याचं मानता येणार नाही, असं म्हणत याचिकादारांची तातडीची विनंती फेटाळली. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा - वैद्यकीयच्या परीक्षांचा मार्ग मोकळा, न्यायालयाने फेटाळली स्थगितीची मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा