वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक NEET (UG) आणि आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक JEE (Main) परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केली आहे. त्यामुळे आता जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं स्थगित करण्यात आल्या होत्या. (NTA lists guidelines for conducting JEE and NEET examinations)
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन याआधी जाहीर करण्यात आलेल्या तारखांप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांना स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलणं विद्यार्थ्यांच्या हिताचं ठरणार नाही. विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेशपत्र देण्यात येईल. ९९ टक्क्यांहून अधिक परीक्षार्थींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या शहरातचं परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन एनटीएने दिलं आहे.
हेही वाचा- सगळ्या परीक्षा पुढं ढकला, आदित्य ठाकरेंनी लिहिलं मोदींना पत्र
National Testing Agency (NTA) says, JEE (Main) and NEET (UG) exams will be held on the dates announced earlier, which are 1st to 6th September and 13th September respectively. pic.twitter.com/TUwxjxn0tl
— ANI (@ANI) August 25, 2020
जेईई (मेन)च्या कम्प्युटर आधारीत परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या ५७० वरून ६६० इतकी वाढवण्यात आली आहे. तर नीट (यूजी) पेपर आधारीत परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या २५४६ वरून ३८४३ इतकी वाढवण्यात आली आहे. एका वर्गात २४ ऐवजी केवळ १२ परीक्षार्थीच बसतील.
जेईई परीक्षेसाठी शिफ्टही वाढवून ८ ते १२ इतकी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शिफ्टमध्ये परीक्षार्थींची संख्या १.३२ लाखांवरून ८५ हजार इतकी कमी करण्यात आली आहे. जेईई करीता ८.५८ लाख परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. तर नीट परीक्षेकरीता १५.९७ लाख परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.
परीक्षा केंद्र सप्टेंबरमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्याची विनंती सर्व राज्यांना करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी नियमावली बनवून देण्यात येईल, असंही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या पाठोपाठ शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून NEET आणि JEE परीक्षांसोबत इतर प्रवेश तसंच स्पर्धात्मक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे.