'हे' रेडिओ स्टेशन झाले 'ऑफ एअर'

Mumbai
'हे' रेडिओ स्टेशन झाले 'ऑफ एअर'
'हे' रेडिओ स्टेशन झाले 'ऑफ एअर'
See all
मुंबई  -  

रेडिओ स्टेशन्सचा प्रभाव सर्वसामान्यांवर किती असतो, याची चुणूक सध्या गाजत असलेल्या मलिष्का, मलिष्का समर्थक  विरुद्ध शिवसेना यांच्यात रंगलेल्या वादामुळे पहायला मिळाली आहेच. रस्त्यांवरील खड्डे सारख्या नागरी समस्यांवरून मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान करणारे मलिष्काने सादर केलेले गीत, त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवेसेनेने मलिष्काच्या अल्पज्ञानावर भाष्य करत तिची रेवडी उडवणारे केलेले विडंबनगीतया वाद-प्रवादात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मलिष्का आणि ती आर जे म्हणून काम करत असलेल्या एफ एम स्टेशनचा फायदाच झाला. हे सर्व घडत असताना काही महिन्यांपूर्वी सक्तीची विश्रांती घेतलेल्या एका सरकारी रेडिओ स्टेशनचे संपलेले अस्तित्व रेडिओप्रेमी जनतेच्या लक्षातही येऊ नये, हा अजब योगायोग आहे. १६० वर्षांची उज्वल शैक्षणिक परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाचे 107.8 मस्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशन चक्क बंद करावे लागले आहे, ही बाब अनेकांच्या गावीही नाही.  


8 फेब्रुवारी 2008 साली सुरू झालेल्या 107.8 मस्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशनसाठी एकूण २५लाख रुपयांची तरतूद मुंबई विद्यापीठाने केली होती. इतकेच नाही तर रेडिओ स्टेशनसाठी दरवर्षी 12 लाख रुपयांचे बजेटही राखण्यात आले. अल्पावधीत हे स्टेशन लोकप्रियही झाले. मॅथ ऑन रेडिओ, दुर्ग महाराष्ट्राचे अशा विविध विषयांवरच्या कार्यक्रमांना उत्तम श्रोतृवर्गही लाभला. पण मार्च 2017 पासून हे रेडिओ स्टेशन बंद करण्याची नामुष्की  विद्यापीठावर ओढवली.
नेमकी फ्रिक्वेंसी कुठे बिघडली?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे सदर रेडिओ स्टेशन बंद करावे लागले आहे. विद्यापीठाचे रेडिओ स्टेशन सुरू झाले. नऊ वर्ष सुरू राहिलेही. 9 वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी सुरुवातीला रेडिओ स्टेशनमध्ये अत्याधुनिक यंत्रेही बसवण्यात आली. थोडक्यात 'मस्ट' ने 'मस्त’ कामगिरी करण्याला पोषक वातावरण तयार करण्यात आले. पण… कालांतराने गोष्टी बदलत गेल्या. विद्यापीठाच्या रेडिओ स्टेशनचा कारभार लाल फीतीच्या कारभारात अडकला. रेडिओ स्टेशनमधली कोणतीही गोष्ट बिघडली की सुधारणा करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. तांत्रिक अडचण आली, मागा परवानगी… निविदा पास करून घ्या, कोटेशन ठरवा… अशा बाबींच्या पूर्ततेसाठी परवानग्यांच्या महाजालातून पुढे जावे लागते.


रेडिओ स्टेशनचा ट्रान्समीटर सलग नऊ वर्षे वापरला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा ट्रान्समीटर बदलणे गरजेचे आहे. पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. प्रक्रियेच्या सोपस्कारांतून पुढे जात हवे ते बदल घडवून आणावे लागतात. लहानसहान  बदलांसाठी थेट विद्यापीठाच्या कुलगुरुंची परवानगी घ्यावी लागते. अभ्यासक्रम सोपा ठेवण्याकडे कटाक्ष असल्याचा दावा करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या रेडिओ स्टेशनमधला कारभार मात्र अतिशय क्लिष्ट आहे. हवे असणारे बदल न होण्यासाठी विद्यापीठाचे प्रशासनच जबाबदार असल्याचे मत या रेडिओ स्टेशनमध्ये आर जे म्हणून काम करणारे पंकज आठवले यांनी व्यक्त केले आहे.  


विद्यापीठातील रेडिओ स्टेशन बंद पडण्यामागे फक्त आणि फक्त विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे. एक ट्रान्समीटर बंद पडलाय, हे आम्ही वेळोवेळी कळवत होतो. मात्र याची प्रक्रिया खूप मोठी असल्यामुळे आम्हाला नवीन  ट्रान्समीटर मिळाला नाही. जर  ट्रान्समीटर वेळेत मिळाला असता तर ऑनएअर जाणे शक्य झाले असते. या सगळ्याला विदयापीठाचा ढिसाळ कारभारच जबाबदार आहे.

- किरण सावंत, एडिटर, मस्ट रेडिओ  स्टेशन


या विषयावर विद्यापीठातील संबंधितांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.  त्यामुळे मस्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशन बंद होण्याची 'प्रशासकीय' कारणेही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. थोडक्यात, विद्यापीठाच्या बंद पडलेल्या या रेडिओ स्टेशनची नोंद 'अकाली बंद पडलेले रेडिओ स्टेशन' अशीच सरकार दफ्तरी होईल. 


हे ही वाचा

तमाशा पुरे, प्रश्न सोडवा!

'सोनु तुझा मायावर...' गाणं गाणारा अवलिया!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.