शिवसेनेचा मलिष्कावर भरोसा नाय

  Mumbai
  शिवसेनेचा मलिष्कावर भरोसा नाय
  मुंबई  -  

  रेड एफ एमच्या माध्यमातून मुंबई  महानगरपालिकेची रेवडी उडवणारे गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमशान घालत आहे. गाण्याद्वारे महापालिकेची  बदनामी करण्याचा प्रयत्न केला असला तरी लोकल ट्रेन आणि ट्रॅफिक सिग्नल  यांच्याशी महापालिकेचा काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे गाण्याचे बोल रचणाऱ्या गीतकारचे अज्ञान उघड होते. महापालिकेच्या माध्यमातून अप्रत्यक्ष शिवसेनेलाच टार्गेट करण्यात आल्यामुळे शिवसेनेने वादाच्या मैदानात उडी घातली असून मलिष्काने आर जेचे काम करावे, अशा शब्दांत तिचा समाचार घेतला आहे.


  हेच ते मलिष्काला प्रत्युत्तर देणारे गाणे

  मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

  पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ? 

  केंद्र सरकार चालवत असलेल्या रेल्वे शेड्युल मध्ये झोल, झोल


  त्यावर तू म्हणते बीएमसीची झालीय पोल खोल.

  रेल्वे आणि बीएमसीचा संबंध काय ते लवकर बोल, बोल,

  आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

  मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

  पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?


  मुंबईच्या रस्त्यावर ट्राफिक लांब लांब, वाहतूक खात्याने लावलेले सिग्नल गोल गोल,

  त्यावर तू म्हणते बीएमसीची झालीय पोल खोल.

  वाहतूक खात्याचा आणि बीएमसीचा संबंध काय ते लवकर बोल, बोल

  आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

  मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

  पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?

  ...

  तुझा मेंदू आहे गोल गोल, तुझ्या मेंदूत असा कसा झोल झोल,

  तुला पैसे घेऊन बोलायचे आहे तेवढे  बोल बोल..

  आर जे तुला मुंबईची बदनामी करण्याचे कारण काय काय?

  मुंबईकरांना बीएमसीवर भरोसा हाय.

  पण तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?


  विडंबनगीत शिवसेनेला झोंबले

  मलिष्काने सादर केलेल्या या विडंबनगीताने शिवसेना चांगलीच बिथरली आहे. मलिष्काला शिवसेनाविरोधी ठरवत तिच्या अज्ञानावर शिवसेनेने तोंडसुख घेतले आहे. सोशल मीडियामध्ये वायरल झालेल्या या गीताच्या जोडीला मुंबईला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी शिवसेनेला जबाबदार मानणाऱ्या  मलिष्कासह अनेकांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारा मेसेजही फिरत आहे.


  विडंबनगीताच्या पहिल्या कडव्याचा समाचार

  मलिष्काने विडंबनगीतातून मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी  शिवसेनेची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण  हे करत असताना पुरेसा अभ्यास करायला ती विसरली किंवा तिला तशी गरज भासली नाही. आपल्या विडंबनगीताच्या पहिल्या कडव्यात मुंबईतल्या मोठमोठ्या आणि गोलगोल खड्ड्यांचा परामर्श घेताना मलिष्काने मुंबई महानगरपालिकेला लक्ष्य केले आहे. पण मुंबईतले सर्वच रस्ते महापालिकेच्या अखत्यारित येत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमयुआयपी आदी राज्य सरकारच्या अखत्यारितल्या विषयांना मलिष्काने बगल दिली आहे. शहरातल्या सर्वच खड्ड्यांचे खापर मुंबई महापालिकेवर फोडणाऱ्या मलिष्काला हे माहित नसेल, असे म्हणत मलिष्काचं अज्ञान दाखवू पाहणाऱ्या शिवसेनेने 'हे वास्तव मलिष्काला ठाऊक असेल तर पैसे घेऊन मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असावे ' असा गंभीर आरोप केला आहे. 


  दुसऱ्या कडव्याची कल्हई

  रस्त्यावरच्या ट्रॅफिक सिग्नलचा आणि ट्रॅफिक जॅमचा बादरायण संबंध जोडणाऱ्या मलिष्काला ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत राखण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे, ट्रॅफिकचा आणि महापालिकेचा काय संबंध? असा प्रश्न विचारत शिवसेनेने मलिष्काच्या सामान्य ज्ञानाची खिल्ली उडवली आहे. 


  तिसऱ्या कडव्याची चिकित्सा

  विडंबनगीताच्या तिसऱ्या कडव्यात मलिष्काने ओव्हरफ्लो पाऊस,  ट्रेनची विस्कळीत वाहतूक, विलंबाने धावणाऱ्या ट्रेन्ससाठीसुद्धा महापालिकेला जबाबदार मानले आहे. केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रातली रेल्वेसेवा कोलमडल्याबद्दल महापालिका कशी जबाबदार? हा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने पुन्हा एकदा मलिष्काच्या अज्ञानावर भाष्य केले आहे. मलिष्का ही बोलबच्चन असल्याचे सांगत तिच्या मेंदूत झोल असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.


  शिवसेनेला विलंबाने आली जाग

  मलिष्काने बीएमसीवर तोंडसुख घेणारे विडंबनगीत सादर केल्यानंतर शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. विडंबनगीताला विडंबनगीताने उत्तर देण्याचा मार्ग शिवसेनेने पत्करला. पण हा विरोध नोंदवायला पक्षाने विलंब केला. मलिष्काचे गाणे घराघरात पोहोचले. यू ट्युबवर गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोनेक दिवसांनी शिवसेना जागी झाली. तोपर्यंत मलिष्काच्या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. विरोध नोंदवण्याच्या बाबतीत शिवसेनेचे टायमिंग चुकले, हे पक्षातले नेतेही खाजगीत मान्य करत आहेत.  


  आयुक्तांना ही विटंबना कशी चालते?

  'प्रजा फाऊंडेशन'ने दोनच दिवसापूर्वी आरोग्य विभागाचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले. यामध्ये महापालिकेकडून आकडेवारी घेऊन त्याचा विपर्यास केला आहे. शिक्षण विभागाच्या बाबतीतही असेच दिशाभूल आणि बदनामी करणारे रिपोर्ट प्रसिद्ध केल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 'प्रजा फाऊंडेशन'ला त्वरित खुलासा करून माफी मागण्यास सांगितले. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु रेड एफ एमच्या माध्यमातून महापालिकेची बदनामी सोशल मीडियातून होत असतांनाही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रेडिओ एफ एमला पत्र पाठवून माफी मागण्यास सांगितले नाही. त्यामुळे आयुक्तांना ही अशा प्रकारे झालेली बदनामी चालते का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

     

  मलिष्काने गायलेल्या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. मालिष्का आणि ज्याच्या सडक्या डोक्यातून ही कल्पना सुचली आहे, त्याची कीव करावीशी वाटते. गाण्यात खड्ड्यांचा उल्लेख आहे, पण मुंबईतील काही रस्ते हे इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहेत. तर ट्रॅफिक आणि रेल्वे यांचाही महापालिकेशी काही संबंध नाही. त्यामुळे महापालिकेशी निगडित किंवा महापालिका काय काम करते याचे तिला ज्ञान नाही. मलिष्काने आधी माहिती घ्यावी आणि मग गाणे गावे. 

  यशवंत जाधव, सभागृह नेते, मुंबई महानगरपालिका 


  हे देखील वाचा - 

  'सोनु तुझा मायावर...' गाणं गाणारा अवलिया!  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.