Advertisement

तमाशा पुरे, प्रश्न सोडवा!


तमाशा पुरे, प्रश्न सोडवा!
SHARES

`सोनू तुला...` या आरजे मलिष्काच्या पॅरोडी साँगवरून सध्या राजकारण सुरू झालंय. शिवसेनेला मिरच्या झोंबल्यानंतर लगेचच मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडणं आणि तिला नोटिस बजावणं, याचं राजकारण झालं नसतं तरच नवल वाटलं असतं.

तसा आकड्यांचा खेळ बघायला गेलं तर ५ वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २६५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा रिपोर्ट प्रजा फाऊंडेशनने दिला होता. परंतु, त्यानंतर जितकी खळबळ माजली नव्हती तितकी मलिष्काच्या नोटिसीनंतर माजली. आणि, त्या खळबळाटात सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपापली राजकीय गणितं सोडवायला सुरुवात केली.

शेलारांनी तर वॉचमनची भूमिका बजावत सेनेवर टीका केली

राष्ट्रवादीने तर तात्काळ कौन बनेगा करोडपती स्टाइलने पोलच घेऊन टाकला...

नितेश राणेंनीही लगेचच सेनेवर ऑनलाइन शरसंधान साधले...

या सर्व गदारोळात राजकीय टिवटिवने कहर केला असला तरी मुंबईकरांच्या मूळ प्रश्नांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसतंय.

मलिष्कानं भलेही प्रसिद्धीसाठी हे पॅरोडी साँग गायले असले तरी तिनं मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तरी कोणी? याची जबाबदारी सध्या सत्तेवर असणारे राजकीय पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवरच आहे, हे विसरून कसे चालेल. मलिष्कानं नवं काहीच विचारलं नाही. फक्त तिनं विचारण्याची पद्धत बदलली आणि तिची पद्धत लोकांनी उचलून धरली. सोशल मीडियाचा वापर जर भाजपासारखा पक्ष करून सत्ता प्राप्त करू शकतो तर, मलिष्कासारख्या आरजेने तिच्या रेडिओ चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी केला तर चुकलं कुठं?

मलिष्काच्या वाढत्या टीआरपीची पोटदुखी खरंतर तिच्या स्पर्धकांना व्हायला हवी होती. शिवसेनेला होण्याची गरजच काय? अर्थात, शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, तिच्या बहुतेक सर्वच प्रश्नांना महापालिका जबाबदार नसून इतर संस्था आहेत, तर शिवसेनेनं स्वतः रस्त्यावर उतरून तिला साथ द्यायला हवी होती. कारण, मलिष्कानं मांडलेल्या प्रश्नांना मुंबईकरांची सहमतीच आहे.

पण, म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी... शिवसेनेच्या नेत्यांपासून शिवसैनिकांना मनातून हे गाणं पटलं असलं तरी झोंबल्याने प्रत्युत्तराची धडपड करावी लागली. आणि तिथेच घात झाला. सोशल मीडियावर तसं कुणाचंच नियंत्रण नाही. त्यामुळं, मलिष्काचं गाणं कोट्यवधींचे व्ह्यूज आणि लाइक्स मिळवत असताना शिवसेनेच्या प्रत्युत्तराच्या गाण्याला लोकांचे डिसलाइक्स सहन करावे लागत आहेत.

इतर राजकीय पक्षांना शिवसेनेविरोधात आयते कोलीत मिळाले असले तरी कुणीच धुतल्या तांदळासारखे नाहीत, हेही सर्व जाणून आहेत.

फक्त वाईट एवढंच वाटतं की, मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या या बातमीला जितकं कव्हरेज आणि प्रतिसाद लोकांकडूनही मिळतो तितकाच प्रतिसाद २६५ टक्क्यांनी डेंग्यू वाढल्याच्या बातमीला मिळत नाही. मुंबईचं आरोग्य बजेट ३,३९० कोटी रुपयांचं असतानाही डेंग्यूला रोखता येत नाही यातूनच प्रशासकीय, राजकीय उदासीनता दिसते.

५ वर्षांत ४८६७ रुग्णसंख्येवरून १७ हजार ७७१ वर डेंग्यूबाधीत पोचतात आणि त्यासाठी कुणीच जाब विचारत नाही. किंवा असं म्हणूया की त्याची जाणीवच फारशी कुणाला होत नाही. पण मलिष्काला नोटिस बजावल्यानंतर सर्व पक्षांना तिचा नको तेवढा पुळका येतो, हे काही पटत नाही.

अर्थात, मलिष्काच्या घरी खरंच अळ्या सापडल्या असतील तर जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावीच. परंतु, या सर्व प्रकारातून एकच लक्षात येतंय ते म्हणजे आता लोकांचे प्रश्नही समोर आणण्यासाठी अशा प्रकारचा तमाशाच करावा लागणार आहे. आणि, या तमाशानंतर तरी खरे प्रश्न सुटणार आहेत का?



(हे सर्व रामायण कसे घडले, ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा)

डेंग्यूच्या अळ्या, राजकारण आणि आरजे मलिष्काचा इशारा!

शिवसेनेचा मलिष्कावर भरोसा नाय


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा