'त्या' ८३३ विद्यार्थ्यांचं राज ठाकरेंना साकडं

सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. जड मोटर वाहन चालविण्याची परवाना आणि सरकारी गॅरेजमधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र, हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले.

SHARE

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केली अाहे. अंतीम निवड होऊन नेमणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील ८३३ विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला अाहे. या उमेदवारांनी शुक्रवारी कृष्णकुंज निवासस्थानी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली. या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असं, आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी या विद्यार्थ्यांना दिलं.


नापास विद्यार्थी कोर्टात

सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. जड मोटर वाहन चालविण्याची परवाना आणि सरकारी गॅरेजमधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र, हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले. त्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली. या परिक्षेतून ८३३  विद्यार्थ्यांची सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी निवड करण्यात अाली. मात्र, काही नापास विद्यार्थ्यांनी या पदासाठीच्या निकषांवर अाक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली. राज्य सरकारने बदलेल्या नियमांवर न्यायालयाने अाक्षेप घेऊन या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली अाहे.


कनिष्ठ वकिलावर जबाबदारी

पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते. तसंच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते. ते थांबविण्यासाठी शासनाने नियमामध्ये बदल केला होता. असे बदल करण्याची गरज का भासली हे शासनातर्फे कोर्टात योग्य प्रकारे मांडलं गेलं नाही. त्यामुळे केवळ याचिकाकर्त्यांची बाजूच न्यायालयापुढे आली, असं या निवड रद्द झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हटलं अाहे. राज्य सरकारने उत्तम वकील न देता कनिष्ठ वकिलावर ही जबाबदारी सोपवली. या सगळ्या प्रकारामुळे न्यायालयाचा निर्णय शासनाविरोधात गेला असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.हेही वाचा -

'असं' आहे दहावीचं संभाव्य वेळापत्रक

प्राध्यापक संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर


संबंधित विषय
ताज्या बातम्या