Advertisement

उत्तरपत्रिकेत नावाचा रकाना नको - युवासेना


उत्तरपत्रिकेत नावाचा रकाना नको - युवासेना
SHARES

मुंबई विद्यापीठानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाचा रकाना दिला आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता भंग पावून गैरप्रकार वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे याला युवा सेनेनं तीव्र विरोध केला असून याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांची भेट घेऊन उत्तरपत्रिकेवरील विद्यार्थ्यांचं नाव लिहिण्याचा रकाना काढून टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान या मागणीकड विद्यापीठानं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेनं दिला आहे.


'उत्तरपत्रिकेत बदल करा'

गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकन पद्धत सुरू केली आहे. परंतु, या प्रक्रियेतील त्रुटीमुळे गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करण्याऐवजी विद्यापीठानं उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती गोपनीय न ठेवता उत्तरपत्रिकेवर नाव लिहिण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकेत फेरफार करण्याची शक्‍यता वाढल्यानं सिनेट सदस्यांनी उत्तरपत्रिकेत बदल करण्याची मागणी केली आहे.


'विद्यापीठाने दखल घ्यावी'

परीक्षा केंद्रापासून ते उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपर्यंतच्या मार्गात सदर प्रक्रियेमुळे उत्तरपत्रिकेची छेडछाड होऊ शकते. उत्तरपत्रिका कोणत्या विद्यार्थ्यांची आहे, हे परीक्षा केंद्रात आणि कॉलेजमध्ये समजणार असल्यास यामध्ये गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी केली आहे. या शिष्टमंडळात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत, सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे इत्यादी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा