‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना ‘असा’ मिळतोय पोषक आहार

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे महिला बचत गटांमार्फत उपहारगृहे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SHARE

औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय)त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच पोषक आहार मिळणार आहे. याकरीता राज्यातील सर्व आयटीआयमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे महिला बचत गटांमार्फत उपहारगृहे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४१७ पैकी १४८ संस्थांमध्ये महिला बचत गटांकडून उपहारगृहे सुरू करण्यात आली आहेत.

हेही वाचा- यंदा १० राज्यांमध्ये होणार एमएचसीईटी

राज्यातील बहुतांश आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना सकाळी ९ ते ५ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण वर्गासाठी विद्यार्थी सकाळी लवकरच नाश्ता न करताच घर सोडतात. आयटीआय संस्थामध्ये उपहारगृह नसल्याने विद्यार्थ्यांना नाश्ता व जेवणासाठी संस्थेबाहेरील हॉटेलमध्ये जावे लागतं. याचा विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसतोच, पण त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे राज्यातील ४१७ आयटीआय संस्थांमध्ये बचत गटामार्फत उपहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला बचत गटांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १४८ संस्थामध्ये उपहारगृहे सुरू करण्यात आली आहेत.  

उपहारगृहे सुरू केल्याने विद्यार्थ्यांना नाश्ता, चहा, दुध व भोजन असा पोषक आहार वाजवी किमतीत मिळत आहे. हा उपक्रम महिला बचत गटांच्या साहाय्याने सुरू करण्यात आल्याने १२०० हून अधिक महिलांना स्वयंरोजगाराची व आर्थिकदृष्टा सक्षम होण्याची संधी मिळाल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायलाचे संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

हेही वाचा- 'या' विषयाची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दीड तासांचा वेळ

विभागनिहाय सुरू झालेली उपहारगृहे

मुंबई २४

औरंगाबाद २०

नाशिक २३

नागपूर ३४

अमरावती २१

पुणे २६

एकूण १४८

संबंधित विषय
ताज्या बातम्या