Advertisement

विद्यापीठातला हेल्पडेस्क विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीच!


विद्यापीठातला हेल्पडेस्क विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीच!
SHARES

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार केलेला हेल्प डेस्क आता विद्यार्थ्यांची डोकेदुखी होऊ लागलाय. हेल्पडेस्क असूनही विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा विद्यापीठात फेऱ्या माराव्या लागतायत, अशी खंत विद्यार्थ्यांनी 'मुंबई लाईव्ह'कडे व्यक्त केली.

मुंबई विद्यापीठाने न्यायालयाने दिलेली डेडलाईन पाळण्यासाठी घाई घाईत निकाल लावायला सुरूवात केली. त्यामुळे निकालात अनेक चुकाही झाल्या. अनेक निकालांमध्ये नापास, अनुपस्थित असे शेरे देण्यात आले. तर हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यामुळे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. त्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी विद्यापीठाने हेल्प डेस्कची सुरूवात केली. मात्र आता तो हेल्प डेस्कच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी झाला आहे.


हेल्प डेस्क

सुरुवातील हेल्पडेस्कवर एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्या अर्जावर विद्यार्थ्याचे नाव, महाविद्यालयाचे नाव, आसनक्रमांक आणि ज्या संदर्भात अडचण आहे, अशी माहिती भरून विद्यापीठाकडे द्यायची असते. आणि त्यानंतर अर्जात आलेल्या तक्रारीनुसार विद्यापीठ तक्रारींचे निवारण करते.


पोचपावती नाहीच

हेल्पडेस्कवर अर्ज भरून दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची पोचपावती मात्र दिली जात नाही. त्यामुळे एकदा अर्ज भरून दिल्यानंतर आपण अर्ज भरून विद्यापीठाकडे दिलाय याबाबत कोणताच पुरावा विद्यार्थ्यांकडे रहात नाही. त्यामुळे 'मी भरून दिलेल्या अर्जाचे, तक्रारीचे पुढे काय झाले?' असे विचारायला विद्यार्थ्यी हेल्प डेस्कवर गेल्यावर त्याला पुन्हा तोच अर्ज भरून द्यावा लागतो. आधीच चुकीच्या निकालामुळे त्रास सहन करावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्प डेस्कमुळे नवीन त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



आम्ही प्रत्येकवेळी ऑफिसला सुट्टी घेऊन विद्यापीठात येतो. मात्र, दरवेळी एकच काम आम्हाला करावे लागते. प्रत्येक वेळी नवीन अर्ज भरून विद्यापीठात द्यावा लागतो. आता निकालासाठी प्रत्येक वेळी सुट्टी घालवणे आम्हाला शक्य नाही. किमान विद्यापीठाने आम्ही दिलेल्या अर्जाची पोचपावती आम्हाला द्यायला हवी.

अशोक जोशी, पालक


आम्ही विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीच पोचपावती देत नाही. तशी यंत्राणाच विद्यापीठात नाही. आलेल्या अर्जातील तक्रारी आम्ही 'मेरीट लिस्ट' कंपनीकडे देतो. त्यानंतर एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे तो पेपर शोधला जाऊन विद्ययापीठात निकालासाठी येतो. ही सर्व प्रक्रिया गुप्तपणे करावी लागते. आता पर्यंत अनेक तक्रारींचे निवारण केले आहे. मात्र नेमका एका तक्रारीसाठी किती वेळ लागेल? हे सांगू शकत नाही, अशी माहिती 'मुंबई लाईव्ह'ला विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.



हेही वाचा

निकाल लागले तरी, विद्यार्थ्यांवर टागंती तलवार कायम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा