सिद्धार्थ कॉलेजचा वार्षिक खेळ महोत्सव येत्या १० डिसेंबर २०१८ रोजी आयोजीत करण्यात आलं आहे. या वार्षिक खेळ महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाईन्सजवळील मैदानाची मागणी कॉलेज प्राचार्यांतर्फे करण्यात आली होती. परंतु विद्यापीठाचं मैदान उपलब्ध नसल्याचं खोटं कारण देत असल्याचा दावा सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य उमाजी मस्के यांनी केला आहे.
फोर्ट परिसरातील नामांकित सिद्धार्थ कॉलेजचा वार्षिक खेळ महोत्सव येत्या १० डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये खेळ महोत्सवासाठी जागा नसल्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून हा महोत्सव मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाईन्सजवळील खेळाच्या मैदानात घेण्यात येतो. दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीही सिद्घार्थ कॉलेजनं ११ जुलै रोजी एका पत्राद्वारे मरीन लाईन्सजवळील मैदान मिळावं, अशी विनंती विद्यापीठ प्रशासनाला केली होती.
त्यानंतर जवळपास पाच महिन्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ प्रशासनाकडून हे मैदान उपलब्ध नसल्याचं पत्र देण्यात आलं होतं. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी खेळ व शारीरिक शिक्षण संचालकांना वारंवार हे मैदान मिळावं यासाठी विनंती केली होती. मात्र अद्याप याबाबत कोणतही उत्तर खेळ व शारीरिक शिक्षण संचालकांकडून देण्यात आलं नाही.
कॉलेजच्या खेळ महोत्सवाची संपूर्ण तयारी झाली आहे. परंतु विद्यापीठाकडून ऐनवेळी मैदान उपलब्ध नसल्याचं कारण दिल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठाचं मैदान आम्ही या महोत्सवासाठी घेत आहोत. दरवर्षीप्रमाणं यंदाही आम्ही तीन ते चार महिन्यांपूर्वी विद्यापीठाचं मैदान हवं असल्याचं पत्र दिलं होतं. मात्र त्याचं उत्तर महोत्सवाच्या १५ दिवस आधी आल्यानं विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
- उमाजी मस्के, प्राचार्य, सिद्धार्थ कॉलेज
सिद्धार्थ कॉलेजचा वार्षिक खेळ महोत्सव येत्या १० डिसेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे. परंतु ११ डिसेंबरपासून वेस्ट झोन अॅँड ऑल इंडिया इंटर झोनल इंटर युनिव्हर्सिटी खो-खो २०१८ आणि वेस्ट झोन अॅंड ऑल इंडिया इंटर झोनल इंटर युनिव्हर्सिटी फुटबॉल २०१८ स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यानं सिद्धार्थ कॉलेजच्या खेळ महोत्सवासाठी नकार देण्यात आला आहे.
- उत्तम केंद्रे, संचालक, खेळ व शारीरिक शिक्षण, मुंबई विद्यापीठ
हेही वाचा -
आयडॉलच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप सुरू, विद्यापीठाचा खुलासा
मुंबई विद्यापीठात हिप-पॉप अभ्यासक्रम