‘दंगल’ करताना आमिर जखमी

  Pali Hill
  ‘दंगल’ करताना आमिर जखमी
  मुंबई  -  

  मुंबई- ‘दंगल’ हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक चॅलेंजिंग चित्रपट आहे. या चित्रपटात वाढवलेलं वजन घटवण्यासाठी मला खूप कष्ट आणि मेहनत करावी लागली. या प्रक्रियेदरम्यान पाच-सहा वेळा मी जखमीही झालो. परंतु, या जखमा फारशा गंभीर नसल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगवर विपरीत परिणाम झाला नाही, अशी माहिती अभिनेता आमिर खानने सोमवारी दिली.

  येत्या २३ डिसेंबरला ‘दंगल’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी आमिरला वजन वाढविण्याबरोबरच ते कमी करण्याचंही मोठं आव्हान होतं. हे आव्हान आमिरनं कसं पेललं, या प्रक्रियेबद्दल बनविण्यात आलेली चित्रफीत सोमवारी मीडियाला दाखवण्यात आली. त्यावेळी आमिर बोलत होता. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांबरोबर डॉ. धुरंधर यांची मदत घेतल्याचा आमिरनं उल्लेख केला. किंबहुना या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतडॉ. धुरंधर यांचे योगदान खूप मोठे असल्याचेही त्याने सांगितले. या चित्रपटासाठी आमिरनं आपलं वजन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं उतरवलं. या चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारी यानं आमिरला चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्यापूर्वी बारीक होण्याचा सल्ला दिला होता. मात्र आमिरनं नितेशला आधी जाड शरीरयष्टीमधील प्रसंग चित्रीत करण्यास सांगितलं. जाड होण्यासाठी त्याच्यावर कसलंही बंधन नव्हते. त्यामुळे या काळात आपण भरपूर चॉकलेटस आणि आइसस्क्रीम खाल्ल्याचं आमिरनं सांगितलं.
  वाढवलेले वजन कमी करण्यासाठी आपल्याला फक्त पाच महिन्यांचा अवधी मिळाल्याचे स्पष्ट करीत आमिर म्हणाला, ‘’फार कठीण दिवस होते ते. कारण माझं वजन ९७ किलोपर्यंत पोचलं होतं. त्यामुळे एका क्षणी तर हे काम आपल्याकडून शक्य होणार नाही, असंही मला वाटलं. परंतु, त्याच वेळी मी ठरवलं की आपण फारसा पुढचा विचार करायचा नाही. एव्हरेस्ट शिखर सर करायचे असेल तर चढाईच्या सुरुवातीला गिर्यारोहक त्याच्या शिखराकडे पाहत नाहीत. त्याप्रमाणेच मी हळूहळू मेहनत घ्यायला लागलो. योग्य तो आहार घेतला आणि काही काळातच मला रिझल्ट मिळायला लागले.’’

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.