Advertisement

राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासही राज्य सरकारनं संमती दिली आहे.

राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय
SHARES

राज्यातील सिनेमागृह सुरू करण्यासही राज्य सरकारनं संमती दिली आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून कोरोनाचे सर्व नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे.

टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

तत्पूर्वी शुक्रवारी राज्य सरकारनं शाळा आणि मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत.

सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावं लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालंच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

राज्यातील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता, ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.हेही वाचा

राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे 'या' दिवसापासून भक्तांसाठी खुली

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार, 'ही' आहे नियमावली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा