Advertisement

मंगेश देसाईनं घेतलं पोलिसांचं ट्रेनिंग!


मंगेश देसाईनं घेतलं पोलिसांचं ट्रेनिंग!
SHARES

काही कलाकार एखाद्या भूमिकेसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असतात. आपणही याच धाटणीचे कलाकार असल्याचं अभिनेता मंगेश देसाई याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आगामी सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी मंगेश देसाईनं चक्क पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं अाहे. पोलिसाचं ट्रेनिंग घेतानाचा अनुभव मंगेशनं ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला अाहे.नवनवीन अाव्हानं स्वीकारणारा कलाकार

नवनवीन आव्हानं स्वीकारत विविधांगी भूमिका साकारणं हा मंगेशचा पिंड आहे. ‘एक अलबेला’ या सिनेमात दिवंगत अभिनेते भगवानदादांची भूमिका यशस्वीरित्या साकारण्यासाठी मंगेशनं वजन वाढवलं होतं. हुबेहूब त्यांच्यासारखी शरीरयष्टी करण्यासाठी तो थोडा लठ्ठ झाला होता. तर दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या ‘लाल बत्ती’ या आगामी मराठी सिनेमासाठी तो पुन्हा फिट झाला आहे.


सत्य घटनेवर आधारित...

‘लाल बत्ती’ या सिनेमाचं कथानक ठाणे इथं घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ठाण्यातील क्यूआरटीमध्ये श्रीकांत सोंडे नावाचे अधिकारी होते. त्यांच्याकडे कमांडो ट्रेनिंगला लाजाळू आणि एकलकोंडा वाटणारा एक मुलगा आला होता. न राहवून सोंडेंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्यांना त्याची आई हरवली असल्याचं समजलं. त्याच्या हरवलेल्या आईचं नेमकं काय झालेलं असतं, हे या सिनेमात पाहायला मिळेल.


क्यूआरटी म्हणजे काय?...

क्यूआरटी म्हणजे क्वीक रिस्पॅान्स टीम... अतिरेकी हल्ल्यासारखी किंवा काहीतरी संवेदनशील घटना घडते तेव्हा ही टीम सर्वात आधी तिथे पोहोचते. खरं तर हे पोलिसांचंच खातं, पण हे पोलीस लष्कराप्रमाणे शस्त्रांनी सुसज्ज असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शत्रूचा खात्मा करण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं असतं.


साकारला क्यूआरटी आॅफिसर

मंगेशनं या सिनेमात मुख्य भूमिकेतील क्यूआरटी आॅफिसर श्रीकांत सोंडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. हे काम खूप कठीण होतं, असं तो मानतो. आई आणि मुलाची भेट घडवून आणण्यासाठी धडपडणारी या व्यक्तिरेखा असून त्याला बरेच कंगोरे आहेत. या व्यक्तिरेखेतील विविध पैलू सादर करताना कस लागल्याचं मंगेश म्हणतो.


२१ दिवसांचं पोलिस ट्रेनिंग...

ठाण्यामध्ये खऱ्या क्यूआरटीच्या जवानांसोबत मंगेशनं २१ दिवस पोलिसांचं प्रॅापर ट्रेनिंग घेतलं आहे. याबाबत मंगेश म्हणाला की, सकाळी साडेपाच वाजता वेकअप कॅाल असायचा. साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत व्यायाम करायचो. दहानंतर शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यानंतर दुपारी थोडा गॅप असायचा. पुन्हा संध्याकाळी ट्रेनिंग करायचो. यातून एक वेगळा अनुभव मिळाला.


कुटुंबियांनीही सहन केलं...

हे ट्रेनिंग घेऊन मळलेल्या कपड्यांनी थकून सुरुवातीला जेव्हा घरी जायचो तेव्हा मी खरंच असं काही करतोय की केवळ नाटक करतोय, असा प्रश्न घरच्यांना पडायचा. पण हळूहळू त्यांना सर्व माहित पडलं. त्यामुळे त्यांनाही माझं कौतुक वाटू लागलं.


गिरीश मोहितेंचं दिग्दर्शन...

‘लाल बत्ती’ या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं आहे. अरविंद जगताप यांनी कथा लिहिली असून, अभय दखने आणि गिरीश मोहिते यांनी पटकथालेखन केलं आहे. मंगेशसोबत एस. तेजस, भार्गवी चिरमुले, मनोज जोशी, रमेश वाणी आणि काही नवीन कलाकार आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. तर छायालेखन कृष्णा सोरेन यांनी केलं आहे. चित्रीकरण पूर्ण झालं असून ‘लाल बत्ती’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.


हेही वाचा -

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखड

दिपाली सय्यदचा अनाथांना हात!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा