Advertisement

टाईम्सच्या व्यासपीठावर फडकला मराठीचा झेंडा

आज जगभरातून मराठी सिनेमे आणि कलाकार-तंत्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात आहे. टाईम्स ग्रुपनंही याची दखल घेतल्यानं नुकताच त्यांच्या व्यासपीठावरही मराठीचा झेंडा फडकल्याचं चित्र पहायला मिळालं.

टाईम्सच्या व्यासपीठावर फडकला मराठीचा झेंडा
SHARES

आज जगभरातून मराठी सिनेमे आणि कलाकार-तंत्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात आहे. टाईम्स ग्रुपनंही याची दखल घेतल्यानं नुकताच त्यांच्या व्यासपीठावरही मराठीचा झेंडा फडकल्याचं चित्र पहायला मिळालं.

संपूर्ण जगाला हेवा वाटावा, असे चित्रपट मराठी भाषेत तयार होत आहेत. या चित्रपट निर्मितीमध्ये कलाकारांपासून स्पॉट बॉयपर्यंत सर्वांचीच मेहनत दडलेली असते. याच मेहनतीची दखल घेऊन भारतातील अग्रगण्य वृत्तसमूहाने 'टाईम्स मराठी फिल्म आयकॉन २०१९' नावानं पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. ज्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास अपूर्ण राहील, असे विनोदवीर अशोक सराफ, मराठी सिनेसृष्टीला 'एकापेक्षा एक' धमाल चित्रपट देणारे सचिन पिळगावकर, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार आणि निर्माते महेश मांजरेकर यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या व्यतिरिक्त या पुरस्कार सोहळ्यात सुबोध भावे, अमृता खानविलकर, अजय-अतुल, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे, विक्रम गायकवाड, महेश लिमये आदींचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ब्लँक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मराठी सिनेसृष्टीची सेवा करत रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांनी या सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आपण जे काम करत आहोत, ते लोकांना आवडते का, याचा विचार करत होतो. हा पुरस्कार त्यांना माझं काम आवडल्याची कामाची पावती आहे. त्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो. मराठी सिनेसृष्टीत महागुरू म्हणून ओळाखल्या जाणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी पुरस्कार दिल्याबद्दल 'टाईम्स'चे आभार मानत ३१ वर्षं पूर्ण झालेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विजू खोटे यांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावणारे मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांनाही या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांनी 'टाईम्स'चे आभार मानत आपल्या दमदार आवाजानं प्रेक्षकांना 'येड…' लावलं.

अदिती भागवतनं सादर केलेल्या गणेश वंदनानं या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली. याशिवाय अनेक कलाकारांच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरले. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच 'भाडीपा'च्या टीमनं या सोहळ्यात स्टॅंडप कॉमेडी सादर करत उपस्थितांना खळखळून हसवलं, तर प्रियांका बर्वेनं आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली. पुष्कर श्रोत्रीनं आपल्या खुमासदार शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. यावेळी प्रसाद ओक, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, श्वेता शिंदे, जयवंत वाडकर, राजेश म्हापुस्कर, वैशाली सामंत, सायली संजीव, अशोक शिंदे, श्रेयश जाधव, सुनील पाल, रीना अग्रवाल आदी कलाकारांची उपस्थिती होती.
हेही वाचा -

लग्नापूर्वीच कल्की देणार गुड न्यूज

'मर्दानी २' चा दमदार टीझर प्रदर्शित, राणी मुखर्जीचा अॅक्शन धमाका
संबंधित विषय
Advertisement