Advertisement

बाॅक्सिंग कोच बनण्यासाठी मिलिंदने वाढवलं वजन

नव्याने सुरू होणाऱ्या ‘सोनी मराठी’ या वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘सारे काही तुझ्याचसाठी’ या मालिकेत मिलिंद गवळीचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. तो आता बाॅक्सिंग कोचच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे.

बाॅक्सिंग कोच बनण्यासाठी मिलिंदने वाढवलं वजन
SHARES

काही कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी वाट्टेल ती मेहनत करायला तयार असतात. या बाबतीत मराठी कलाकार मागे नाहीत. नेहमीच विविधांगी भूमिकांच्या शोधात असणाऱ्या मिलिंद गवळीने बाॅक्सिंग कोचच्या भूमिकेसाठी आपलं वजन वाढवलं आहे.

कधी सैनिक, तर कधी पोलिस अधिकारी... कधी व्यावसायिक, तर कधी शेतकरी... अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारा अभिनेता मिलिंद गवळी आता बाॅक्सिंग कोचच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या ‘सोनी मराठी’ या वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘सारे काही तुझ्याचसाठी’ या मालिकेत मिलिंदचं हे नवं रूप पाहायला मिळणार आहे. या नव्या लुकबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना मिलिंदने भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीबाबत सांगितलं.

प्रथमच बाॅक्सरच्या भूमिकेत

आजवर मी बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत, पण बाॅक्सरची भूमिका प्रथमच साकारतो आहे. हा बाॅक्सिंग कोच आहे. याची एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यात ‘सारे काही तुझ्याचसाठी’ची नायिका गौतमी देशपांडे बाॅक्सिंग शिकायला येते. कडक शिस्तीचा असा हा कोच आहे. आपल्या काळात याने बाॅक्सिंगची रिंग गाजवलेली आहे.


बाॅक्सिंग कोच साकारताना

ही व्यक्तिरेखा इतर व्यक्तिरेखांइतकी साधी आणि सोपी नव्हती. या मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी यांनी जेव्हा याची आॅफर दिली तेव्हा ती आनंदाने स्वीकारली. पण त्यावेळीच मी या भूमिकेच्या तयारीसाठी वेळ लागणार असल्याचं सांगितलं. त्यांनी वेळ देण्याचं कबूल केल्याने भूमिकेसाठी मेहनत घेणं सोपं गेलं.


ट्रेनिंग आणि वजनात वाढ

या मालिकेसाठी सर्वप्रथम मी पुन्हा जीम जाॅइन केली. जवळजवळ पाच महिने दररोज दोन तास जीममध्ये घाम गाळून बाॅक्सिंगसाठी उपयुक्त अशी बाॅडी तयार केली. या दरम्यान जवळजवळ पाच किलो वजन वाढवलं. या मालिकेमुळे पुन्हा जीमची गोडी लागली. केवळ बाॅडी तयार करून उपयोगाचं नसल्याने बाॅक्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. स्टेट चॅम्पियन असलेल्या कृष्णा यांच्यासोबत बाॅक्सिंगचे धडे गिरवले. आणखी चार किलो वजन वाढेल असा अंदाज आहे.


असा आहे रोल

या बाॅक्सिंग कोचचं नाव सॅम आहे. या मालिकेतील नायिकेला बाॅक्सिंग शिकवण्याचं काम तो करतो. मालिकेचे लेखक आणि निर्माते यांनी हे कॅरेक्टर डेव्हलप केलं आहे. हा केवळ नायिकेला बाॅक्सिंगच शिकवत नाही, तर तिला वडिलांप्रमाणे असल्याने इतर गोष्टींमध्येही मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे या मालिकेत ही भूमिका खूप महत्त्वाची आहे.


काय नावीन्य आहे?

मूळात या मालिकेची संकल्पनाच नावीन्यपूर्ण आहे. बाॅक्सिंग करणाऱ्या एखाद्या मुलीची गोष्ट आजवर कधीच मालिकांमध्ये पाहायला मिळालेली नाही. या मालिकेत एका अशा जोडीची प्रेम कहाणी पहायला मिळेल, ज्याची नायिका बाॅक्सिर आहे आणि नायक क्लासिकल गायक आहे. या दोघांमध्ये फुलणारी प्रेमकथा आणि दोघांचा आपापल्या करियरकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.


प्रेरणादायी कथानक

ही मालिका म्हणजे समाजात घडणाऱ्या बदलाचं प्रतिबिंब आहे. आज केवळ शहरातीलच नव्हे, तर गाव पातळीवरील मुलीही मुलांच्या पुढे जात आहेत. मुली नाहीत असं कोणतंही क्षेत्र आज शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळेच या मालिकेची कथा प्रत्येक मुलीला प्रेरणादायी ठरावी अशी आहे.



हेही वाचा -

‘अलबत्या गलबत्या’चं शतक आणि ५ प्रयोगांचा विक्रम 

दिग्दर्शनाकडे वळताना संजय खापरेने केली ‘गलती से मिस्टेक’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा