• ‘मोठी तिची सावली’ अशीच राहू दे- मीना मंगेशकर-खडीकर
  • ‘मोठी तिची सावली’ अशीच राहू दे- मीना मंगेशकर-खडीकर
SHARE

गानसम्राज्ञी, स्वरमाऊली, भारतरत्न लता मंगेशकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणादिवशी हृदयेश आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दीदींच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘मोठी तिची सावली’ या बहुचर्चित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते मीना मंगेशकर-खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विद्या-वाचस्पती शंकर अभ्यंकर, एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आनंद तेजावर, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, प्रकाशक आप्पा परचुरे, लेखक प्रवीण जोशी यांसमवेत इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


दीदींची जीवन कथा

या पुस्तकाबद्दल बोलताना मीना मंगेशकर-खडीकर म्हणाल्या की, ''आमची राधा ७ वर्षांची असताना तिच्या एका कवितेचं मी ध्वनिमुद्रण केलं होतं. त्या कवितेचे शब्द होते, ‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली....’ बाबा गेल्यानंतर अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी दीदीनं आम्हाला तिच्या सावलीत सामावून घेतलं म्हणूनच दीदींची जीवन कथा सांगणाऱ्या या पुस्तकाचं शीर्षक मी ‘मोठी तिची सावली’ असं ठेवलं. ही तिची सावली आम्हां सर्वांवर अशीच राहू दे ही माझी मंगेशाचारणी प्रार्थना''.
विश्वव्यापी सावली

सुमित्रा महाजन यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, मीनाताईंनी एक आठवण म्हणून लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या स्वरांनी संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या या विश्वव्यापी सावलीला तिच्या नव्वदाव्या वर्षातील पदार्पणाबद्दल शुभेच्छा देण्याची ही संधी मी नाकारली असती तर मी करंटी ठरली असते.
दीदींच्या सर्वात जवळ

लहानपणीच्या आठवणींमध्ये रमत आशा भोसले म्हणाल्या की, ''मीनाताईने लिहिलेलं हे पुस्तक अजूनपर्यंत मी वाचलेलं नाही, पण एवढं मात्र नक्की की दिदींच्या सर्वांत जवळ मी आहे. माई आम्हाला नेहमी म्हणायची ‘दिदीची चमची आशा आणि मीनाची चमची उषा’. लहान असताना दीदी नेहमी मला उचलून घेऊन फिरायची. एकदा असंच तिने मला उचलून घेतलेलं असताना काहीतरी कामाच्या नादात शिडीवरून पाय घसरल्यामुळे आम्ही दोघी पडलो. तेव्हा मला थोडंसंच लागलेलं. परंतु दीदीला माझ्यापेक्षा खूप अधिक लागलेलं. अगदी रक्तस्राव झालेला. तेव्हापासून तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे.

आजही मला पायापर्यंत येणाऱ्या दोन जड वेण्या घालून हातात तंबोरा घेऊन सकाळी रियाज करत बसलेली दीदी आठवते, तिच्या सूरात एक प्रकारची अशी काही जादू आहे की, तिच्या सुरांमध्ये कितीतरी लोकांचं आयुष्य जन्मोनजन्म विलीन झालं असेल. मी देवाचरणी एकाच प्रार्थना करते की, माझं आयुष्य तिला लाभो!''हेही वाचा-

आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम लक्ष्मण यांना


 

संबंधित विषय
ताज्या बातम्या