Advertisement

'शादी में जरूर आना' पाहायला जाताय? त्याआधी हे नक्की वाचा


'शादी में जरूर आना' पाहायला जाताय? त्याआधी हे नक्की वाचा
SHARES

राजकुमार राव त्याच्या वेगळ्या आणि हटके भूमिकांसाठी नेहमीच ओळखला जातो. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'न्यूटन' चित्रपटात राजकुमार रावच्या अभिनयाचा आणखीन एक पैलू पाहायला मिळाला. राजकुमारचे सर्व चित्रपट पाहता प्रेक्षकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आता अधिक वाढल्या आहेत. पण 'शादी में जरूर आना' सारखा चित्रपट निवडून त्यानं प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी ओतलं आहे, असंच म्हणावं लागेल.

'शादी में जरूर आना' या चित्रपटात राजकुमार राव आणि कृती खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकुमार रावनं चित्रपटात मध्यवर्गीय कुटुंबातील तरूणाची भूमिका साकारली आहे. अरेंज मॅरेजची सुंदर प्रेमकथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. कानपूरमधून चित्रपटाची कथा सुरू होते. एका सेवानिवृत्त प्रोफेसरचा एकुलता एक मुलगा सत्यंद्र मिश्रा उर्फ सत्तु (राजकुमार राव) आणि सरकारी कर्मचाऱ्याची मुलगी आरती शुक्ला (कृती खरबंदा) यांच्या लग्नाची ही गोष्ट. सत्यंद्रला आरतीचे फोटो दाखवले जातात. सत्तुच्या कुटुंबाला आरती पसंत पडते. पण लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना भेटावं आणि समजून घ्यावं असं आरतीच्या आईची इच्छा असते. 

पण आरतीचा लग्नाला विरोध असतो. तिला शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहायचं असतं. पण वडिलांच्या दबावाखाली येऊन ती लग्नासाठी होकार देते. त्यानंतर सत्तू आणि आरतीची भेट होते. पण पहिल्याच भेटीत आरतीला सत्तू आवडू लागतो. दोघांचे लग्न ठरते. पण सत्तूचे कुटुंब आरतीच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी करतात. आरतीचे वडील कसेबसे हुंडा देतात. पण लग्नाच्या एक दिवसाआधी आरती पळून जाते. इथूनच चित्रपटाला वेगळी कलाटणी मिळते. आरती का पळून जाते? सत्तूचे पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी 'शादी में जरूर आना' हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल.

पण हे सगळं असूनही स्क्रिप्ट, डायलॉग्स आणि कथेमध्ये दम नसल्यामुळे सिनेमा सपशेल फेल ठरतो. स्क्रिप्ट आणि डायलॉग्समध्ये नावीन्यपूर्ण असं काहीच वाटत नाही. तेच ते जुन्या पद्धतीचे डायलॉग्स असल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतो. राजकुमार रावसारखा ताकदीचा अभिनेता असूनही तोही सिनेमाला वाचवू शकत नाही. कृती या चित्रपटात खूपच सुंदर दिसत आहे. पण फक्त सुंदर दिसून काम होत नाही. सुंदरतेसोबतच अभिनयाची सांगड असणंही आवश्यक आहे. त्या बाबतीत मात्र ती अपयशी ठरते. एकूणच कथानकात काही वेगळेपणा नसल्यामुळे जर तुम्ही राजकुमार रावचे मोठे चाहते असाल, तरच तुम्ही हा चित्रपट बघण्याचा बेत आखू शकता.



हेही वाचा

हिंदीतले खलनायक आता मराठीत दिसणार!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा