Advertisement

‘ट्रकभर स्वप्न’ सिनेमाद्वारे मुकेश ऋषी मराठीत


‘ट्रकभर स्वप्न’ सिनेमाद्वारे मुकेश ऋषी मराठीत
SHARES

आजवर हिंदीसह दक्षिणात्य प्रादेशीक भाषांमध्ये खलनायकी रंग उधळणाऱ्या मुकेश ऋषी यांची पावलं आता मराठीच्या दिशेने वळली आहेत. अभिनेते प्रमोद पवार यांचं पहिलं दिग्दर्शन असलेल्या ‘ट्रकभर स्वप्न’ या मराठी सिनेमात मुकेश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.


विविधांगी भूमिका साकारल्या 

हिंदी सिनेसृष्टीतील आजच्या काळातील भारदस्त अभिनेत्यांचा विषय येताच मुकेश ऋषी यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तीमत्व आणि पहाडी आवाज लाभलेल्या मुकेश यांनी आजवर कधी खलनायक, तर कधी पोलिस इन्स्पेक्टर… कधी गँगस्टर, तर कधी अतिरेकी… अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘सरफरोश’, ‘घातक’, ‘घायल’, ‘कोई मिल गया’ अशा एका पेक्षा एक हिट झालेल्या सिनेमांमधील मुकेश यांच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या आहेत.


मराठीचा स्वाद चाखता आला

मुकेश आता मराठीकडे वळले ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात मुकेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा एका सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वप्नांचा प्रवास सादर करणारा आहे. मुकेश यांनी आजवर तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमिळ अशा विविध प्रादेषिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असल्याचं सांगत आपल्या व्यक्तिरेखेबाबत मुकेश म्हणाले की, ‘ट्रकभर स्वप्न’ची अॉफर खरं तर मी यातील व्यक्तीरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारली. आजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. पण या सिनेमातील व्यक्तीरेखा खूप वेगळी आहे. हा लोकांना पैसे देतो, पण त्या बदल्यात अपेक्षाही करतो. या निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला.


खेळकर वातावरणात चित्रीकरण 

‘ट्रकभर स्वप्न’मधील व्यक्तिरेखेप्रमाणेच मुकेश या सिनेमाचे दिग्दर्शक आणि पूर्ण टीमच्याही प्रेमात आहेत. ते म्हणाले की, सिनेमाचे दिग्दर्शक प्रमोद पवार हे मराठीतील नामवंत अभिनेते असल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला. अतिशय खेळकर वातावरणात या सिनेमाचं चित्रीकरण कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही.


२४ ऑगस्टला प्रदर्शित 

‘ट्रकभर स्वप्न’ची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. मुकेश यांच्याखेरीज मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रस्तुती आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि. व आदित्य चित्र प्रा. लि. यांनी केली आहे. मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मिती सल्लागार आहेत.



हेही वाचा -

अभिनयासाठी ताजमधील नोकरीला ‘तिने’ ठोकला रामराम

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘हैद्राबाद कस्टडी’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा