Advertisement

बिग बींना राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून शुभेच्छा


बिग बींना राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून शुभेच्छा
SHARES

बॉलिवूडचे महानायक बिग बी म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 75 वा वाढदिवस...त्यांना सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिग बी यांना त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे'. असे राज यांनी म्हटले आहे. 2008 च्या सुमारास राज यांनी मराठीचा मुद्दा उचलल्यानंतर त्यांनी थेट अमिताभ यांना लक्ष्य केले होते.




काय म्हणालेत राज ठाकरे?

शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानाने मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्याने कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकले. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेने आणि ऊर्जेने काम करत आहेत. हे पाहिले की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचे शीर्षक आठवते, 'हे सर्व कोठून येतं?'




'काही वर्षांपूर्वी माझा अमिताभ बच्चन यांच्याशी वाद झाला. त्याचे स्पष्टीकरण मी दिले. माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समक्ष मी ती मांडली आहे, हेही आवर्जून सांगतो. इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की लता दीदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही लोकोत्तर माणसे एका राज्यापुरती मर्यादित नाहीत. ती साऱ्या भारताची आहेत'.



'पण मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही. अमिताभ बच्चन हे सिनेमा संस्कृतीचे राजदूत आहेत यावरून वाद होऊ शकत नाही. गेल्या चाळीसएक वर्षात अमिताभ बच्चन यांनी कचकड्याच्या पडद्यावर अनेक रूपे चिथारली. अगणित भूमिका सजीव केल्या. काळानुसार बदलत गेलेले त्यांचे अनेकविध चेहरे इथे सादर केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त. एका एकमेवाद्वितीय कलावंताला माझ्यातल्या कलावंताने दिलेली ही छोटीशी भेट. ती तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो'. असे म्हणत त्यांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छादेखील दिल्या.


हेही वाचा - 

केबीसीच्या सेटवर का भावूक झाले अमिताभ? वाचा

अमिताभ मराठीत ट्वीट करतात तेव्हा...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा