Advertisement

'मनसे'च्या पानसेंना राऊतांनी केलं ना'राज'?


'मनसे'च्या पानसेंना राऊतांनी केलं ना'राज'?
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'ठाकरे' सिनेमाच्या खास स्क्रिनिंगला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनाच बसायला जागा न मिळाल्याने मानापमानाचं प्रकरण समोर आलं आहे. अपमानास्पद वागणूकीनंतर आणखी शोभा नको या विचाराने पानसे यांनी कुटुंबासह थेट सिनेमागृहातून बाहेर पडणं पसंत केलं.

अपमानास्पद वागणूक!

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत मान्यवरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ठाकरे' सिनेमाच्या विशेष स्क्रिनिंगला मानापमानाचा प्रकार घडला. वरळी येथील आयनॅाक्स सिनेमागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोला पोहोचण्यासाठी अभिजीत पानसे यांना थोडा उशीर झाला. त्यामुळे पानसे आणि त्यांच्या कुटुंबियांना बसण्यासाठी जागाच मिळाली नाही. या अपमानास्पद वागणूकीमुळे थोडा वेळ थांबून पानसे यांनी कटुंबियांसह काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मनधरणी आणि सारवासारव

पानसे सिनेमागृहातून बाहेर जात असल्याचं समजताच 'ठाकरे'चे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी ताबडतोब येऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तिथे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याची माहिती मिळाली आहे. सिनेमागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच घडलेलं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानं घडला प्रकार समोर आला. पानसेंसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती; परंतु त्यांना यायला उशीर झाल्यानं सीट्स उरल्या नसल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं.

'मनसे'च्या पानसेंचा 'ठाकरे'

केवळ 'ठाकरे'च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळीच पानसे यांना सावत्र वागणूक देण्यात आलेली आहे असं नाही, तर सिनेमाची घोषणा करण्याच्या क्षणापासून प्रत्येक सोहळ्यात त्यांना थोडं मागेच ठेवण्यात आलं होतं. ट्रेलर लाँचनंतर पानसे यांना बॅकफुटवर टाकून प्रत्येक ठिकाणी राऊतच फ्रंटफूटवर दिसू लागले. संगीत प्रकाशन सोहळ्यातही पानसे असून नसल्यासारखे होते. पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असल्याने या सर्व गोष्टी मनसेच्या कार्यकर्त्यांना खटकत होत्या. त्यामुळेच 'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'ठाकरे' चित्रपटाला शुभेच्छा' असा मजकूर असलेले सिनेमाचे पोस्टर मनसेतर्फे लावण्यात आले होते.

सोशल मीडियावर मोहीम!

आपल्या नेत्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने सोशल मीडियावर #SupportAbhijeetPanse (हॅशटॅग सपोर्ट अभिजीत पानसे)ही मोहिमही राबवण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक कार्यकर्त्यांनी पानसे यांना पाठिंबा दर्शवत अनाहुतपणे त्यांना मिळत असलेल्या सावत्र वागणुकीला विरोध केला आहे. बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारा सिनेमा मनसेच्या नेत्याने बनवल्याने कार्यकर्त्यांमध्येही अभिमानाची भावना आहे. पानसेंच्या काही जीवलग मित्रांनी 'मित्रा चुकलास' अशा आशयाच्या पोस्ट शेअर करत सुरुवातीपासून स्क्रिनिंगपर्यंतचा घडलेला संपूर्ण घटनाक्रमच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा