
ठाण्यातील प्रस्तावित बालकुम ते आनंदनगर कोस्टल रोडच्या मार्गाचा फेरविचार करण्याचे निर्देश महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी अर्थात MCZMAने MMRDAला दिले आहेत.
प्रस्तावित मार्ग ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरातून जाणार असून, यामुळे 2.72 हेक्टर वनजमिनीवरील तब्बल 3,754 कांदळवनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
MMRDAने या प्रकल्पासाठीचा प्रस्ताव 11 ऑगस्ट रोजी MCZMAकडे सादर केला होता. प्रकल्पाला पुढे जाण्यासाठी या प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी इतर पर्यायी मार्गांचा अभ्यास करा, असे MCZMAने MMRDAला सांगितले आहे.
तसंच, राज्य वन विभागाच्या मॅन्ग्रोव्ह प्रिझर्व्हेशन सेलने तयार केलेला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या अहवालातून प्रस्तावित रस्त्याचा कांदळवनांवर नेमका किती परिणाम होईल, याचा अंदाज घेतला जाणार आहे.
याशिवाय, प्रकल्पामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याची माहिती MMRDAला द्यावी लागणार आहे. कांदळवनांची भरपाई म्हणून पर्यायी ठिकाणी कांदळवन लागवडीचा आराखडाही सादर करावा लागणार आहे.
हा प्रकल्प एलिव्हेटेड ठाणे कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आहे. या माध्यमातून बालकुम ते मुलुंड पूर्वेतील आनंदनगर हा भाग जोडला जाणार आहे. या रस्त्यामुळे कल्याण, नाशिक आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाकडे जाणारी वाहतूक ठाणे शहराबाहेरून वळवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, MMRDAकडून घाटकोपर ते ठाणे या सहा पदरी ईस्टर्न फ्रीवेच्या विस्ताराचे कामही सुरू आहे. या विस्तारित फ्रीवेलाही प्रस्तावित कोस्टल रोडशी जोडण्यात येणार आहे.
मात्र, मार्ग बदलणे सोपे नसल्याचे MMRDAच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. कारण प्रस्तावित मार्ग हा ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या रोड कॉरिडॉरनुसार आहे.
आनंदनगर येथे हा रस्ता ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, प्रस्तावित कोपरी-पाटणी पूल आणि ईस्टर्न फ्रीवेच्या प्रस्तावित विस्ताराला जोडला जाणार आहे.
विशेष म्हणजे, कांदळवन आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागातून जाणाऱ्या रस्त्याच्या डिझाइनचा MMRDAने बचाव केला आहे. या भागातील रस्ता उंचावर म्हणजेच एलिव्हेटेड स्वरूपात आणि पिलर्सवर बांधला जाणार आहे. त्यामुळे जमिनीवर रस्त्याचा प्रत्यक्ष ठसा कमी राहील, असा MMRDAचा दावा आहे.
