SHARE

दरवर्षी महाराष्ट्रात नोव्होंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. मात्र, यंदा डिसेंबर महिना उजाडला असून राज्यातील जनतेला थंडीची चाहुल लागलेली नाही. परंतु, असं असताना थंडीच्या महिन्यात राज्यभरात अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये उत्तर-पूर्व मान्सून सक्रिय असतो आणि याचा परिणाम म्हणून पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू, पाँडेचरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाची नोंद होते. यंदाच्या वर्षी मात्र, १ आॅक्टोबर ते १ डिसेंबर या काळात पश्चिमेकडील राज्यांत अतिरिक्त पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागानं केली आहे.

पावसाची नोंद

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात ९१.५ मिलीमीटर पावसाची नोंद होते. परंतु, यंदा यामध्ये वाढ झाली असून, १८३.१ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळं यंदा १०० टक्के अधिक पाऊस महाराष्ट्रात पडल्याची माहिती समोर येत आहे.

कमी दाबाचं क्षेत्र

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ४८ तासांत चक्रीवादळाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे.

मुंबईत ढगाळ वातावरण

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश ३ आणि ४ डिसेंबर रोजी अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशांच्या आसपास राहील. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ३ ते ४ डिसेंबर रोजी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान ५ ते ६ डिसेंबर रोजी कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.हेही वाचा -

माहितीच्या अधिकाराचे अर्ज फेटाळू नये, राज्य पोलिस मुख्यालयातून आदेश जारी

'नीट'साठी अर्जप्रकिया सुरू, ३ मे रोजी परीक्षासंबंधित विषय
ताज्या बातम्या