Advertisement

पावसानं मारली दडी, मोडकसागर तलावातील जलसाठ्यात घट

मुंबईकरांची तहान मोठ्या प्रमाणावर भागविणारा भातसा तलाव अद्याप पूर्ण क्षमतेनं भरलेला नाही.

पावसानं मारली दडी, मोडकसागर तलावातील जलसाठ्यात घट
SHARES

गेले काही दिवस पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे मोडकसागर तलावातील जलपातळीत सुमारे १.२५ मीटरनं घट झाली आहे. शिवाय मुंबईकरांची तहान मोठ्या प्रमाणावर भागविणारा भातसा तलाव अद्याप पूर्ण क्षमतेनं भरलेला नाही.

मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला तेव्हा त्याची पाणीपुरवठा पातळी १६३.१५ मीटर इतकी पातळी होती. ही या तलावाची पूर्ण पाणी पुरवठा पातळी आहे. मात्र पालिकेकडून उपलब्ध झालेल्या १७ सप्टेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार मोडकसागरची पाणी पातळी १६१.९० मीटरपर्यंत खाली आली आहे. साधारण महिन्याभरात या तलावातील पाणी पातळी १.२५ मीटरनी कमी झाली आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशीमधून दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये पावसाच्या तुरळक हजेरीमुळे या सातही तलावांतील पाणीसाठा खालावला होता. मात्र जुलैमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी भातसामधून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येतो. भातसाची पूर्ण पाणी पुरवठा पातळी १४२.०७ मीटर इतकी आहे. तलावाची आजची पातळी १४१.७० मीटर इतकी आहे. अगदी ०.३७ मीटर पातळी जागा तलावात शिल्लक आहे. मात्र गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाच्या लंपडावामुळे हा तलावही अद्याप भरलेला नाही.

ऑगस्टमध्ये कोसळलेल्या पावसामुळे तलावं ओसंडून वाहत होती. तुळशी तलावानंतर ५ ऑगस्ट रोजी विहार तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी मोडकसागर आणि २० ऑगस्ट रोजी तानसा तलावही ओसंडून वाहू लागला. दरम्यान पावसानं ओढ घेतल्यामुळे मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र चार तलाव भरून वाहू लागल्यानं सुरुवातीला १० टक्के आणि त्यानंतर उर्वरित पाच टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली.हेही वाचा

नवी मुंबई : दर आठवड्याला खारफुटी जंगलातून निघतोय २०० किलो कचरा

मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, पाराही चढला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement