Advertisement

मुंबईतील पारा चढला, बुधवारी तापमानाची विक्रमी उसळी

ग्रामीण भागासह मुंबई शहर आणि उपनगरात उकाडा चांगलाच वाढला आहे.

मुंबईतील पारा चढला, बुधवारी तापमानाची विक्रमी उसळी
SHARES

ग्रामीण भागासह मुंबई शहर आणि उपनगरात उकाडा चांगलाच वाढला आहे. बुधवारी दिवसभरात पाऱ्यानं विक्रमी उसळी घेतली. कुलाब्यात पाऱ्यानं ३५.४ अंशांची पातळी गाठली.

याचवेळी सांताक्रुझमध्ये कमाल तापमानानं विक्रमी कहर केला. या ठिकाणी ३८.१ अंश अशी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. याशिवाय होळीच्या तोंडावरच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात चालू महिन्याच्या सुरुवातीला तापमानानं विक्रमी ३८ अंशांची पातळी गाठली होती. तसंच १३ मार्चला ३८.२ अंशांची नोंद झाली होती. कमाल तापमानानं मुंबईकरांना घामाघूम केलं आहे. काही दिवसांमध्ये तापमानात याचप्रकारे वाढ नोंदवण्यात येईल आणि उकाडाही कायम राहील, असे हवामान खात्यानं म्हटलं आहे.

मुंबईकरांना मार्च महिन्यातच मे सारख्या कडक उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड इथंही पाराही वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदवण्यात आले आहे.

याचवेळी अनेक भागांत अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तरेकडील राज्य आणि हिमालयाच्या विभागातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ७ अंशांनी वाढ झाली आहे. परिणामी राज्यातही दिवसाच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे.

कोकणात उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. आज रत्नागिरीमध्ये ३९ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

समुद्राकडील थंडे वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहीत होताना अडथळा येत आहे. त्यामुळे मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील तापमान वाढले आहे. तसंच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात सध्या हजेरी लावत असलेला अवकाळी पाऊस पुढील काही दिवस मुक्कामी असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं ट्विटर हॅण्डलद्वारे वर्तवला आहे.



हेही वाचा

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

Aarey Forest: मुंबईतील सर्वात मोठ्या जंगलाबद्दल जाणून घ्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा