चला वसुंधरेला सुंदर बनवू !

  Mumbai
  चला वसुंधरेला सुंदर बनवू !
  मुंबई  -  

  दरवर्षी 5 जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा केला जातो. यंदा 'एक दिवस निसर्गासोबत' अशी या दिवसाची संकल्पना आहे. 1972 पासून हा दिवस जगभरात 'पर्यावरण दिन' म्हणून साजरा होतो. 'स्टॉक होम' येथे 5 जून 1972 साली पर्यावरणाविषयी पहिली जागतिक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण 45 वर्ष उलटल्यानंतरही पर्यावरणाचा प्रश्न 'जैसे थे'च आहे. हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

  जागतिक तापमानवाढीचे परिणामही आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. जागतिक लोकसंख्येत 1.6 अब्जाने वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते. त्याहूनही अधिक प्रमाणात आपण त्याचा वापर करत आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी 85 टक्के तापमान वाढ एकट्या कार्बन डायऑक्साइडमुळे झाली आहे.

  पर्यावरण संतुलनामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड, छोट्या वनस्पती, कीटक, प्राणी, पक्षी यांना आश्रय देते. झाडांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. वृक्षांमुळेच जमिनीत पाणी मुरते आणि पूर असो वा दुष्काळ यांसारखी नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होते.

  वृक्षांपासून आपल्याला जवळपास 50 हजार कोटी रुपयांची साधनसंपत्ती दरवर्षी उपलब्ध होत असते. ज्याप्रमाणे मानवाला या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे वृक्ष, प्राणी, पक्षी, सर्व 

  जीव-जंतूंनासुद्धा या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे. याच भावनेतून आपण आपली जबाबदारी समजून प्रत्येकी एक झाड आपल्या घरी, आपल्या आजूबाजूच्या परिसरात लावून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. नाहीतर एक दिवस या पृथ्वीसोबत आपला विनाशही निश्चित आहे.

  अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत बदलती जीवनशैली आणि वाढत्या गरजा या निसर्गाच्या साधनसंपतीद्वारेच पूर्ण होत असतात. याचा जास्त फायदा न घेता त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करूया. पर्यावरणाचे जतन, पृथ्वी स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून आपण या पर्यावरण दिनी आपली पृथ्वी कशी सुंदर ठेवता येईल यासाठी जरूर प्रयत्न करूया.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.