Advertisement

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामधील शेवंताची एंट्री झाल्यापासून आपल्या बहारदार अदाकारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ही शेवंता नेमकी आहे तरी कोण? हे जाणण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?
SHARES

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या गल्लीबोळापासून सोशल मीडियापर्यंत एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे शेवंता... झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वामधील शेवंताची एंट्री झाल्यापासून आपल्या बहारदार अदाकारीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ही शेवंता नेमकी आहे तरी कोण? हे जाणण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

'मुंबई लाईव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना शेवंता साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपला आजवरचा प्रवास उलगडला. यासोबतच 'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताबद्दल आणि शेवंताने मिळवून दिलेल्या प्रसिद्धीबाबत तिन दिलखुलास चर्चा केली. तळ कोकणातील काहीशी गूढ कथा सांगणाऱ्या 'रात्रीस खेळ चाले' या मालवणी भाषेतील मालिकेच्या पहिल्या पर्वाने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर या मालिकेचं दुसरं पर्वही रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरत आहे. या मालिकेतील आण्णा नाईक आणि शेवंता पाटणकर ही जोडी आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.


मीदेखील फॅन होते

शेवंता साकारणाऱ्या अपूर्वाबाबत सांगायचं तर यापूर्वी तिने काही मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे, पण 'रात्रीस खेळ चाले'ने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेबद्दल अपूर्वा म्हणाली की, मी आता जरी 'रात्रीस खेळ चाले'मध्ये असले तरी इतरांसारखीच पहिल्या सीझनपासून मीही या मालिकेची फॅन आहे. भविष्यात आपणही या मालिकेत दिसू असा विचारही कधी केला नव्हता. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं माझ्यासाठी सरप्राईज होतं. पहिल्या सीझनमध्ये इतरांप्रमाणे मलाही शेवंताची उत्सुकता होती, पण ती शेवंता आपण असू असं कधी वाटलं नव्हतं.


मलाच ठाऊक नव्हतं

'रात्रीस खेळ चाले'मधील एंट्रीबद्दल अपूर्वा म्हणाली की, सोमील क्रिएशन्समधून मला फोन आला आणि आॅडिशनसाठी बोलावण्यात आलं. आपल्या वाट्याला नेमकी कोणती भूमिका येणार हे मला त्यावेळी ठाऊक नव्हतं. प्रॅाडक्शनकडूनही काही डिस्क्लोज करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मी केवळ आॅडिशन देण्याचं काम केलं. त्यामुळे मला जेव्हा शेवंता साकारायची आहे हे कळलं तेव्हा खूप आनंद झाला. या जोडीलाच ही व्यक्तिरेखा साकारताना थोडी जबाबदारीचं भानही राखायचं होतं.


मादक, पण छिछोर नाही

आज शेवंताच्या अदा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर परदेशातील मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी रसिकांनाही घायाळ करत आहेत. याबाबत विचारणा केली असता अपूर्वा म्हणाली की, खरं तर हे कॅरेक्टर झी मराठीची क्रिएटिव्ह टिम, मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत आणि प्रॅाडक्शन हाऊस यांनी डिझाईन केलं आहे. मी केवळ त्यात जीव ओतण्याचं काम केलं आहे. राजू सावंत ज्याप्रमाणे सूचना देतात त्याप्रमाणे मी शेवंता साकारते. शेवंतासाठी निवड झाल्यावर माध्यव अभ्यंकर साकारत असलेल्या आण्णांसमोर ती शोभून दिसायला हवी यासाठी मला पाच ते सहा किलो वजन वाढवावं लागलं. शेवंता दिसायला सुंदर असली, तिच्या अदा मादक आणि घायाळ करणाऱ्या असल्या तरी ती छिछोर असता कामा नये याचं आम्ही काटेकोरपणे पालन केलं आहे. त्यामुळे ती थीन लाईन आम्ही कायम सांभाळली आहे. शेवंता फक्त आण्णांकडे आकर्षित होते. इतर पुरुषांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन तसा नाही हे महत्त्वाचं आहे.


दोघीही सावंतवाडीच्याच

अपूर्वाच्या बाबतीतला अजब योगायोग म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण सावंतवाडी येथील अकेरी गावात सुरू आहे आणि अपूर्वादेखील मूळची सावंतवाडीमधीलच नेमळे गावातील आहे. आजही नेमळेमध्ये तिचे काका राहतात. त्यांच्या बागा, घर, प्रॅापर्टी सारं काही गावी आहे. मुंबईतील किंग जॅार्ज हायस्कूलमध्ये शिकलेल्या अपूर्वाने रूपारेल कॅालेजमधून बीएमएस केलं आहे. २०११ मध्ये झी मराठीवरील 'आभास हा' या मालिकेत आर्या साकारत अपूर्वा अभिनयाकडे वळली. त्यानंतर २०१३ मध्ये स्टार प्रवाहवर 'आराधना', २०१५ मध्ये 'तू जीवाला गुंतवावे' आणि अलीकडे 'तू माझा सांगाती' या मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.


मराठी-हिंदी सिनेमे

'भाकरखडी - ७ किमी' या मराठी सिनेमासोबतच तिने 'इश्कवाला लव्ह' या हिंदी-तेलुगू भाषेत बनलेल्या सिनेमातही काम केलं आहे. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या हिंदी सिनेमातही ती दिसली होती. 'आलाय मोठा शहाणा' या नाटकातील भूमिकेसाठी अपूर्वाला नाट्य परिषदेचा बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय 'चोरीचा मामला' या नाटकातही तिने काम केलं आहे. अक्षय खन्ना अभिनीत 'सब कुछ मंगल' या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासोबतच एका वेबसिरीजची आॅफरही तिच्याकडे आहे. तसं पाहिलं तर अपूर्वाने आजवर खूप काम केलं आहे, पण खरी लोकप्रियता तिला शेवंतानेच मिळवून दिली आहे. शेवंतावर भरभरून प्रेम केल्याबद्दल शेवटी प्रेक्षकांचे आभार मानायला अपूर्वा विसरली नाही.



हेही वाचा -

EXCLUSIVE : सावधान! 'दलित पँथर' येतोय

यासाठी सई जाणार अज्ञातवासात!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा