Advertisement

रमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे

आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये मॅाडर्न लुकमधील भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेच्या मनातील ही इच्छा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेनं पूर्ण केली आहे. या मालिकेत ती बाबासाहेबांची पत्नी रमाबाईंची भूमिका साकारत आहे.

रमाबाईंच्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून श्रीमंत केलं - शिवानी रांगोळे
SHARES

ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळावी हे बऱ्याच कलाकारांचं स्वप्न असतं. आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये मॅाडर्न लुकमधील भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेच्या मनातील ही इच्छा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेनं पूर्ण केली आहे. या मालिकेत ती बाबासाहेबांची पत्नी रमाबाईंची भूमिका साकारत आहे. या भूमिकेनं तिला बरंच काही दिलं. याबाबतच्या आपल्या भावना शिवानीनं दिलखुलासपणे व्यक्त केल्या आहेत.

१०० एपिसोड्सचा टप्पा

शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड मेहनतही घेत आहे. या मालिकेनं नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पाही गाठला आहे. या निमित्त गप्पा मारताना रमाबाई साकारताना आलेल्या अनुभवाविषयी सांगत शिवानी म्हणाली की, ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि ठेहराव असणारं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करत आहे. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होत आहे. 

अविस्मरणीय अनुभव

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'मधील रमाबाई सजीव करण्यासाठी शिवानीला बऱ्याच जणांची मदत लाभली आहे. याविषयी ती म्हणाली की, दशमी प्रोडक्शन, स्टार प्रवाह वाहिनी आणि माझे सर्वच सहकलाकारांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मला मदत होत आहे. जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारणा झाली, तेव्हा प्रचंड दडपण होतं. मी याआधी अशा प्रकारची भूमिका केली नव्हती, पण संपूर्ण टीमनं धीर दिला आणि मला नवं बळ मिळालं. पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर हळूहळू दडपण कमी होत गेलं. बघता बघता या मालिकेनं १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. रमाबाईंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

कणखर व्यक्तिमत्त्व 

प्रत्येक भूमिका कलाकाराला काही ना काही देत असते. रमाबाईंच्या या भूमिकेनंही शिवानीला बरंच काही दिलं आहे. ती म्हणाली की, रमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असोत, वा सत्याग्रह... रमाबाई त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणं उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत त्यांनी मोठ्या निष्ठेनं आणि प्रेमानं पाळलं. अशा थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. एक अभिनेत्री म्हणून या भूमिकेनं मला श्रीमंत केलं आहे. रमाबाई अतिशय कणखर आणि संयमी होत्या. अत्यंत हालाखीची परीस्थिती असतानाही त्यांनी इतरांना मदत केली. शिक्षणासाठी आंबेडकर परदेशी असताना कोणतीही तक्रार न करता संसाराचा सक्षमरित्या भार सांभाळला. ही सोपी गोष्ट नाही. रमाबाईंचं कणखर व्यक्तिमत्त्व साकारताना त्यांचे विचार आणि जिद्द माझ्या मनात खोलवर रुजली आहे. 

आईचा आदर्श डोळ्यासमोर 

बाबासाहेबांची आॅनस्क्रीन पत्नी रमाबाई साकारताना शिवानीच्या डोळ्यांसमोर रिअल लाईफमधील एक व्यक्तिरेखा होती. ती डोळ्यांसमोर ठेवून शिवानीनं रमाबाई साकारल्या आहेत. याविषयी शिवानी म्हणाली की, रमाबाई साकारण्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन. माझी आई शिक्षिका होती. माझ्या जन्मानंतर तिनं नोकरी सोडली आणि संपूर्णपणे मला वेळ देण्याचं ठरवलं. अभिनय क्षेत्रात येण्यासाठीही तिचा खंबीर पाठिंबा होता. मी पुण्यात वाढले आहे, पण शूटिंगसाठी मुंबईला असते. आईच्या पाठिंब्यामुळं हे शक्य झालं आहे. भूमिका साकरताना मी आईचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवते.

 ग्रामीण बोलीभाषा

आजवर नेहमीच ग्लॅमरस भूमिका साकारणारी शिवानी या मालिकेत ग्रामीण बोलीभाषेत बोलताना दिसत आहे. यासाठी खूप अभ्यास करावा लागल्याचं सांगत शिवानी म्हणाली की, ही भाषा आत्मसात करणं फार अवघड गेलं नाही. कारण नातलग, आप्तेष्ट यांच्या सहवासामुळं लहानपणापासूनच या भाषेचा लहेजा माझ्या कानावर पडत असे. त्यामुळं ही भाषा नवी नव्हती. मालिकेच्या निमित्तानं रोजच या भाषेत संवाद साधते असल्यानं त्यात सहजता आल्याचं शिवानी मानते.



हेही वाचा -

विवाहबंधनात अडकणार अक्षय आणि अमृता!

'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा